पुणे : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना संसर्गाचा संसर्ग कमी होताना दिसत आहे. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्यात येत आहे. नगरपालिका व ग्रामपंचायतमध्ये जनजागृती करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली आहे.

ग्रामीण भागात कोरोना बाधितांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे येथील “हॉटस्पॉट’ ठरलेल्या गावांची संख्याही झपाट्याने कमी होत आहे. ऑगस्टमध्ये तब्बल साडे आठशेपर्यंत पोहचलेली ही संख्या वेगाने खाली येत आहे. सध्या आडीचशेच्या आसपास गावांमध्ये “हॉटस्पॉट’ आहेत.

अनलॉक सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागातही वर्दळ वाढल्याने ही नव्या कोरोना बाधितांची संख्या वाढत होती. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये ग्रामीण भागात संसर्ग अधिकच वाढला होता. त्यावर तत्काळ उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाने “माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम सुरू केली. मोहिमेचा दुसरा टप्पा सध्या सुरू असून, सर्वेक्षणामुळे ग्रामीण भागातील संसर्गाची साखळी तुटण्यास मदत होत आहे.

आता अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची समिती स्थापन करण्यात आली असून, यात तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांचा समावेश आहे. आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती, नगरपालिका पदाधिकारी विशेष निमंत्रित म्हणून आहेत. दर दोन महिन्यांनी घेण्यात येणाऱ्या बैठकीला तालुक्यातील प्रतिष्ठीत नागरिक, आरोग्यासाठी काम करणार्‍या स्वंयसेवी संस्थांना बोलविण्यात येईल. ही समिती तालुक्यातून कोरोना हद्दपार होईपर्यंत कामकाज करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *