प्रशांत राठोड, प्रतिक रामटेके

हरभऱ्यासारखे पीक घेतल्यामुळे हवेतील नत्राचे स्थिरीकरण होऊन खर्चात बचत तर करता येते. तसेच जमिनीची खालावत चाललेली सुपिकता जोपासणेही शक्य होते. रब्बी हंगामामघ्ये ओलीताची सोय नसलेल्या क्षेत्रावर गहु पिकास उत्तम पर्याय म्हणुन काळया कसदार जमिनीत हे पीक उपलब्ध ओलाव्याचा उपयोग करुन तसेच तुलनेने कमी खतांच्या वापरातुन घेता येईल. पीक फेरपालट होऊन जमीन आरोग्यासाठी ते हीतावह ठरेल.

काळया जमिनीत उपलब्ध ओलाव्याचा उपयोग करुन रब्बी हंगामात हरभरा हे पिक घेण्यासाठी उत्तम वाव आहे. महाराष्ट्रात हरभरा पिकाखाली १३ लक्ष हेक्टर क्षेत्र असुन, उत्पादन ९.२४ लक्ष टन एवढे आणि सरासरी उत्पादन ७०६ किलो प्रति हेक्टरी एवढे आहे. सर्वसाधारणपणे पिकांना एकूण सतरा अन्नद्रव्यांची गरज असते. यात मुख्य अन्नद्रव्ये जसे नत्र, स्फुरद व पालाष अधिक प्रमाणात लागतात. दुय्यम अन्नद्रव्ये जसे कॅल्शिअम, मॅग्नेशिअम व गंधक मध्यम प्रमाणात तर सूक्ष्म अन्नद्रव्ये जसे जस्त, कॉपर, लोह व मंगल कमी प्रमाणात लागतात. मातीपरिक्षणानुसार अन्नद्रव्याचा वापर केल्यास खतांची बचत होते. तसेच खतांचा संतुलित वापर होऊन जमिनीची सुपिकता वाढेल व कालांतराने उत्पादनात शाश्वतता येईल.

कडधान्य पिके रायझोबीयम या जैविक खताद्वारे हवेतील नत्र शोषुन घेतात. त्यामुळे नत्राची गरज हरभरा या पिकास स्फुरदाच्या तुलनेने कमी असते. हरभरा या पिकास जैविक खताची बीज प्रक्रिया करण्यापूर्वी ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रति किलो या बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी. नंतर रायझोबियम व स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धक २५० ग्रॅम प्रति दहा किलो बियाण्यास चोळावे. एक लिटर गरम पाण्यात १२५ ग्रॅम गुळाचे द्रावण तयार करावे. द्रावण थंड करुन त्यामध्ये जिवाणू संवर्धक मिसळावे. नंतर हलक्या हाताने १० ते १२ किलो बियाण्यास चोळावे. या प्रमाणे प्रक्रिया केलेल्या बियाण्याची २४ तासात पेरणी करावी.

हरभरा हे डाळवर्गीय पीक असल्यामुळे या पिंकाला खताची गरज नाही असा चुकीचा समज आहे. परंतू शिफारशीनुसार किंवा माती परिक्षाणाच्या अहवालानुसार खतांचा संतूलित वापर केल्यास चांगले उत्पादन मिळू शकेल. आणि निश्चितच उत्पादकता वाढविण्यास मदत होईल. हरभरा या पिकाचे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या दृष्टीने प्रति हेक्टरी ५ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पूर्व मशागतीच्या वेळी खरीपाच्या आधी शेतात मिसळून घेतलेले आवश्यक आहे. खरीपात शेणखत दिले असल्यास पून्हा रब्बी हंगामात म्हणजेच हरभरा लागवडीचे वेळी देण्याची गरज नाही.

ओलीताखालील हरभऱ्यास पेरणीचे वेळी २५ किलो नत्र अधिक ५० किलो स्फुरद द्यावे. म्हणजे सरळ खतांच्या स्वरुपात ५५ किलो युरीया व ३१३ किलो सिंगल सुपर फॅास्फेटच्या माध्यमातून द्यावे. हरभरा हे दाळवर्गीय पिक असल्यामुळे मुळांवरील गाठीद्वारे हवेतील नत्राचे स्थिरिकरण होउन पिक वाढीच्या काळात याचा फायदा होतो. परंतू फुलोरा अवस्थेपासून मूळावरील गाठी निष्क्रीय होउन नत्र स्थिरिकरणाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे नत्राची कमतरात भासून उत्पादनात घट येण्याची शक्यता असते.

हरभरा पीक फुलोऱ्यात असताना २ टक्के युरियाची म्हणजेच २०० ग्रॅम युरिया १० लिटर पाण्यात विरघळवून दहा दिवसाच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी. या व्यतिरिक्त २ टक्के डि. ए. पी. किंवा २ टक्के पोटॅशिअम क्लोराईडचा अथवा 2 टक्के पोटॅशिअम नायट्रेट ची फवारणी केल्यास उत्पादनात अपेक्षित वाढ मिळू शकेल. रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी व जमिनीतील स्थिर स्फुरद उपलब्ध होण्यासाठी जैविक खतांचा हरभरा पिकात वापर केल्यास उत्पादनात १० ते १५ टक्क्यांनी वाढ होऊन जमिनीची सुपिकता व उत्पादकता वाढेल.

लेखक : प्रशांत राठोड, प्रतिक रामटेके हे डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला येथे आचार्य पदवीचे विद्यार्थी आहेत. मो. ९६६५०५८०१७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!