अरबी समुद्रात कमी दाब क्षेत्राचे संकेत; तापमानातही चढ-उतार शक्य

पुणे : पावसाला पोषक हवामान होत असल्याने राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्राच्या दक्षिण भागात गुरूवारी (ता. १९) कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. उत्तरेकडील राज्यात थंडी वाढू लागली असून, राज्याच्या तापमानातही चढ-उतार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

सध्या पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे उत्तरेकडील वाऱ्यांना अडथळा निर्माण होत असल्याने गारठा कमी झाला आहे. बंगालच्या उपसागरावरून बाष्पाचा पुरवठा होत असल्याने राज्यात ढगाळ हवामान होत असून, उकाड्यात वाढ झाली आहे. ईशान्य मोसमी वारे सक्रीय असल्याने दक्षिण भारतातील राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. तर शुक्रवारपर्यंत (ता. २०) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.

अरबी समुद्राच्या दक्षिण भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. गुरूवारी (ता. १९) या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहे. या प्रणालीची तीव्रता वाढून ती पश्चिमेकडे सरकून जाण्याची शक्यता आहे. याच दरम्यान उत्तरेकडील वाऱ्यांचे प्रवाह महाराष्ट्राकडे येऊन राज्याच्या किमान तापमानात घट होण्याचा अंदाज आहे. पुढील काही दिवस आकाश ढगाळ राहणार असल्याने सकाळी गारठा तर दुपारी उकाडा असे हवामान राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

बुधवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवले गेलेले किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १८.५, जळगाव १९.१, कोल्हापूर २२.४, महाबळेश्वर १७.९, मालेगाव २०.८, नाशिक १७.३, सांगली २२.८, सातारा २०.५, सोलापूर २१.३, मुंबई (कुलाबा) २५.०, सांताक्रूझ २४.०, रत्नागिरी २४.५, डहाणू २४.३, औरंगाबाद १७.७, परभणी १७.७, नांदेड १९.०, बीड २१.१, अकोला २०.०, अमरावती १७.७, बुलढाणा २०.०, ब्रम्हपुरी २०.२, चंद्रपूर १९.२, गोंदिया १८.०, नागपूर १८.६, वाशीम १९.०, वर्धा १९.५.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *