‘गती’ चक्रीवादळ निवळते तोच पूर्व किनाऱ्याला वादळाचा इशारा

पुणे : दक्षिण भारतालगतच्या समुद्रात वादळामागून वादळांची साखळी सुरू आहे. अरबी समुद्रात आलेले ‘गती’ तीव्र चक्रीवादळ निवळतेय तोच बंगालच्या उपसागरात तामिळनाडूच्या किनाऱ्यालगत मंगळवारी (ता.२४) नव्याने चक्रीवादळ तयार होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

ईशान्य मोसमी वारे (ईशान्य मॉन्सून) सक्रीय असल्याने दक्षिण भारतातील राज्यामध्ये पाऊस पडत आहे. यातच पूर्वेकडील वाऱ्यांमुळे राज्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली. उत्तरेकडील थंड वाऱ्यांना अडथळे निर्माण झाल्याने राज्यात अद्यापही थंडीची प्रतिक्षा आहे. दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असलीतरी दुपारी उन्हाचा चटका वाढून उकाड्यातही वाढ झाली आहे.

अग्नेय अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्र पश्चिमेकडे सोमालिया देशाकडे सरकताना त्याचे ‘गती’ चक्रीवादळात रूपांतरण झाले. सोमवारी (ता. २३) सकाळी हे वादळ सोमालियाच्या रास बिन्नाहजवळ निवळण्यास सुरूवात झाली होती. या वादळाने अरबी समुद्रातील बाष्प आढून नेले.

दरम्यान, अग्नेय बंगालच्या उपसागरात पदुच्चेरीपासून ५५० किलोमीटर, तर चेन्नईपासून ५९० किलोमीटर अग्नेयेकडे तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. मंगळवारी सकाळपर्यंत (ता.२४) या भागात चक्रीवादळ तयार होण्याचे संकेत आहेत. ही वादळी प्रणाली पूर्व किनारपट्टीकडे झेपावत असून, बुधवारी (ता.२५) दुपारपर्यंत तामिळनाडू आणि पदुचेरीच्या कराईकल आणि ममल्लापूरमलगत किनाऱ्याला धडकण्याची शक्यता आहे.

हे वादळ किनाऱ्याला धडकताना तीव्र होऊन ताशी १०० ते १२० किलोमीटर वेगाने वारे वाहून, मुसळधार पावासाचा इशारा देण्यात आला आहे. आंध्रप्रदेश, तामिळनाडू राज्यात पावासाचा फटका बसणार आहे. फळबागा आणि किनाऱ्यालगतच्या शेती पिकांचे नुकसान होणार आहे. किनाऱ्यावरही उंच लाटा उसळून, समुद्र खवळणार असल्याने मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

या वादळी प्रणालीच्या प्रभावामुळे विदर्भ, मराठवाड्यासह राज्याच्या काही भागात पावसाला पोषक हवामान होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील ही वादळी प्रणाली निवळल्यानंतर श्रीलंकेच्या पूर्व किनाऱ्यालगत नवीन कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!