संपुर्ण विदर्भातून माघार; बुधवारपर्यंत घेणार देशाचा निरोप

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) परतीच्या प्रवासात वेग धरला आहे. सोमवारी (ता. २६) संपुर्ण विदर्भासह निम्म्या महाराष्ट्रातून वारे परतले आहेत. डहाणू, नाशिक, नांदेडपर्यंतच्या भागातून मॉन्सून माघारी फिरल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. दोन दिवसात बुधवारपर्यंत मॉन्सून संपुर्ण देशाचा निरोप घेण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

यंदा नियमित सर्वसाधारण वेळेच्या (१७ सप्टेंबर) तब्बल अकरा दिवस उशीराने मॉन्सून परताच्या प्रवासाला निघाला. वायव्य भारतातील पश्चिम राजस्थानातून २८ सप्टेंबर रोजी मॉन्सूनने परतीचा प्रवास सुरू केला. ६ ऑक्टोबर रोजी बहुतांशी वायव्य आणि उत्तर भारतातून वारे परतले. बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रामुळे परतीच्या प्रवासाला अडथळा निर्माण झाला. २१ ऑक्टोबर रोजी पूर्व भारतातून मान्सून परतला.

मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाल्यानंतर राज्यात पावसाने अक्षरश: थैमान घातले. सातत्याने पडणाऱ्या मुसळधार पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. दोन तीन दिवसांपासून राज्याच्या विविध भागात पावसाने उघडीप दिली आहे. परतीच्या सुधारीत वेळापत्रकानुसार १५ ऑक्टोबरपर्यंत मॉन्सून देशातून माघारी जाणे अपेक्षित होते. परतीचा प्रवास लांबला असून, दोन दिवसात मॉन्सून देशाचा निरोप घेण्याची शक्यता असून, त्यानंतर दक्षिण भारतात ईशान्य मॉन्सून सक्रीय होणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *