महाराष्ट्रासह संपुर्ण देशातून परतले वारे ; हवामान विभागाची घोषणा

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी (ता. २८) संपुर्ण देशाचा निरोप घेतला. महाराष्ट्रासह संपुर्ण देशातून वारे परतल्याचे भारतीय हवामान विभागाने जाहीर केले. दक्षिण भारतातील राज्यांमध्ये ईशान्य मोसमी वारे (नॉर्थइस्ट मॉन्सून) सक्रीय झाल्याची घोषणाही हवामान विभागाने केली आहे.

यंदा मॉन्सून १ जून रोजी केरळात, तर ११ जून रोजी मॉन्सून महाराष्ट्रात दाखल झाला. १४ जून रोजी संपुर्ण महाराष्ट्र तर संभाव्य वेळेच्या (८ जूलै) १२ दिवस आगोदर २६ जून रोजी मॉन्सून वाऱ्यांनी संपुर्ण देश व्यापला. राजस्थानमध्ये तीन महिने दोन दिवस मुक्काम केल्यानंतर २८ सप्टेंबर रोजी वारे परतीला निघाले.

नियमित सर्वसाधारण वेळेच्या (१७ सप्टेंबर) तब्बल अकरा दिवस उशीराने मॉन्सूनने पश्चिम राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू केला. ६ ऑक्टोबर रोजी बहुतांशी वायव्य आणि उत्तर भारतातून वारे परतले. बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रामुळे परतीच्या प्रवासाला अडथळा निर्माण झाला. २१ ऑक्टोबर रोजी पूर्व भारतातून मॉन्सून परतला. तर २६ ऑक्टोबर रोजी निम्म्या महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांशी भागातून मॉन्सून माघारी फिरला.

हवामान विभागाने जाहीर केलेल्या परतीच्या सुधारीत वेळापत्रकानुसार १५ ऑक्टोबरपर्यंत मॉन्सून देशातून माघारी जाणे अपेक्षित होते. परतीचा प्रवास यंदा चांगलाच लांबला. १ जूनला देशात दाखल झालेल्या मॉन्सूनने देशभरात तब्बल ४ महिने २७ दिवस मुक्काम केला. बुधवारी (ता.२८) मॉन्सूनने देशाचा निरोप घेतल्याचे जाहीर करण्यात आले.

मॉन्सूनची देशातील परतीची स्थिती

वर्षपरतीचा दिवस
२०१६ २८ ऑक्टोबर
२०१७२५ ऑक्टोबर
२०१८२१ ऑक्टोबर
२०१९१६ ऑक्टोबर
२०२०२८ ऑक्टोबर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *