महाराष्ट्र राज्यात १३.५ लक्ष हेक्टर क्षेत्र फळबागाखाली असून त्यापासून सुमारे ११.५ दशलक्ष टन उत्पादन होते. महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण मुख्य फळपिकाखालील क्षेत्रापैकी आंबा २५.१३ टक्के, संत्री १४.९७ टक्के, काजू १२.४० टक्के द्राक्ष ११.९४ टक्के व चिक्कूचा वाटा १२.४० टक्के इतका आहे. तर महाराष्ट्र राज्याच्या डाळिंब, द्राक्षे व केळी या फळ पिकाखाली असणाऱ्या क्षेत्रापैकी अनुक्रमे ९३, ९५, व ७५ % वाटा हा पश्चिम महाराष्ट्राचा असल्याचा दिसून येतो.

फळझाडांची चांगली वाढ, उत्पादित आयुष्य, फळाचा रंग, आकार हे त्या त्या विभागातील हवामान (पाउस, आर्द्रता, तापमान इ.), जमिनीचा प्रकार, पाण्याची प्रत यावर अवलंबून असते आणि म्हणूनच कोकणात आंबा (हापूस), काजू, कोकम, करवंद, फणस, लीची इत्यादीं फळपिकांचे उत्पादन व गुणवत्ता चांगली असते. अगदी त्याचप्रकारे विदर्भात संत्रा, पश्चिम महाराष्ट्रातील डाळिंब, द्राक्षे, पेरू, आंबा, चिक्कू, केळी, लिंबू, सीताफळ, आवळा, अंजीर, बोर, इ. फळपिकांचे गुणवत्तापूर्ण उत्पादन घेतले जाते.

महारष्ट्रातील शेतकरी फळबाग दरवर्षी करत असतात परंतु ज्या प्रमाणात लागवड होत आहे त्या प्रमाणात क्षेत्र वाढताना दिसत नाही याचे मुख्य कारण म्हणजे जमिनीची अयोग्य निवड व बिघडत चाललेले जमिनीचे आरोग्य. या कारणांमुळे फळबागेचे उत्पादित आयुष्य कमी होऊन चार ते पाच वर्षात फळबागा तोडल्या गेल्या. साधारणपणे हलक्या जमिनीमध्ये कमी कालावधीत येणारी फळपिके लागवड करावी उदा. डाळिंब, बोर, सीताफळ, अंजीर इ. तसेच दीर्घायुष्य असलेले फळपिके लागवड मध्यम ते खोल, चांगला निचरा असलेल्या जमिनीत केल्यास फळपिकांचे भरपूर उत्पादित आयुष्य मिळते

फळझाडांच्या योग्य लागवड आणि उत्पादित आयुष्य वाढविण्यासाठी खालील प्रमाणे व्यवस्थापन करावे

  • माती पारीक्षणासाठी नमुना घेण्याची पद्धत : लागवडीपूर्वी शेतामधे मध्यभागी प्रातिनिधिक स्वरुपात मुरूम लागेपर्यंत खड्डा घ्यावा, मुरूम नसल्यास जास्तीत जास्त तीन फुट खड्डा घ्यावा. हलक्या जमिनीत पहिल्या एक फुट (० ते ३० सेमीपर्यंत) थरातील माती नमुना घ्यावा, मध्यम खोल जमिनीतील पहिल्या एक फुट थरातील (० ते ३० सेमीपर्यंत) व दुसऱ्या थरातील (० ते ६० सेमीपर्यंत) मातीचे वेगवेगळे दोन नमुने घावे. जमीन खोल असल्यास प्रत्येक थरातील (० ते ३० सेमी, ३० ते ६० सेमी व ६० ते ९० सेमी ) मातीचे तीन वेगवेगळे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पृथ: करणासाठी पाठवावे.
  • माती परीक्षणामध्ये सगळ्यात महत्वाचे पायाभूत गुणधर्म तपासावे, त्यामध्ये प्रामुख्याने सामू, विद्युत वाहकता (क्षारता). चुनखडीचे प्रमाण आणि या तिनही गुणधर्मांना संतुलित ठेवणारा गुणधर्म म्हणजे जमिनीतील सेंद्रिय कर्ब या घटकांचा पृथ: करणामध्ये समावेश असावा. मातीचा सामू ६.५ ते ८.० पर्यंत असावा, विद्युत वाहकता (क्षारता) ०.५० डेसीसायमन प्रती मीटर पेक्षा कमी असावी, मुक्त चुनखडीचे प्रमाण १० % पेक्षा कमी असावे, तर सेंद्रिय कर्ब ०.६० % पेक्षा जास्त असावे. मात्र मुक्त चुनखडीचे प्रमाण १५ % पेक्षा जास्त असल्यास ती हानिकारक वर्गवारी असते. अश्या जमिनीत कोणतीही फळबाग लागवड करू नये.
  • भारी काळ्या जमिनीत निचरा नसलेल्या चोपण जमिनीत (सामू ८.५ पेक्षा जास्त) फळबाग लागवड करू नये. तसेच क्षारयुक्त जमिनीत (सामू ८.५ पेक्षा कमी व क्षारता १.५ डेसी सायमन प्रती मीटर पेक्षा जास्त) फळबाग लागवड करू नये.
  • नांगराच्या तासात फळबाग लागवड करू नये. उत्पादित आयुष्य वाढविण्यासाठी खड्डा घेऊन लागवड करावी. या खड्ड्यात १ घमेले शेणखत + १०० ग्रॅम फाँलीडॉल किंवा लिंडेन पावडर + १ किलो सुपर फाँस्फेट + माती एकत्र करून खड्डे भरावेत व लागवड करावी तसेच नवीन रोपांना काठीचा आधार द्यावा.
  • जमिनीतील एक फुटाच्या आत बेसाल्ट खडकाची तळी लागल्यास फळबाग लागवड करू नये.
  • बहार धरण्यापूर्वी फळझाडांना नैसर्गिक ताण द्यावा. पाण्याच्या उपलब्धतेनुसार व मार्केट नुसार बहराचे नियोजन करावे.
  • सध्या उभ्या असलेल्या फळबागेतील दोन ओळींमध्ये माती नमुना घेऊन परीक्षण करावे. पृथ: करणाद्वारे पायाभूत गुणधर्म चांगले नसल्यास उदा. सामू ८.० पेक्षा जास्त, विद्युत वाहकता ०.५० डेसीसायमन प्रती मीटर पेक्षा जास्त व चुनखडीचे प्रमाण १० % पेक्षा जास्त असतील तर सेंद्रिय खतांचा वापर जास्त करावा, शेताच्या कडेला भारी जमिनीत चार काढून अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा, जीवामृतची आळवणी दर दोन ते तीन महिन्याने वापसा असताना जमिनीतून करावी, माती परीक्षणानुसार कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर शेणखतात आठवडाभर मुरवून बहराच्यावेळी बेसल डोस मध्ये मिसळून झाडांना जमिनीतून द्यावे.
  • मुक्त चुनखडीचे प्रमाण १२ % टक्केपर्यंत असलेल्या चुनखडीयुक्त जमिनीत आवळा, सीताफळ, अंजीर, बोर, इ. फळबागांची लागवड करू शकता, फक्त या जमिनीत शेंखातांचा वापर जास्त करावा. जीवामृतची आळवणी करावी. सूक्ष्म अन्नद्रव्यांचा (विशेषतः जस्त, लोह, बोरॉन)जमिनीतून व फवारणीद्वारे वापर करावा. या जमिनीत सूत्रकृमीची वाढ होण्याची शक्यता जास्त असल्यामुळे जैविक कीटकनाशकांचा (ट्रायकोडर्मा प्लस) वापर किडींचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून व प्रतिबंधक उपययोजना म्हणून दरवर्षी करावा.
  • फुलोरा अवस्थेत कीड व रोगाच्या नियंत्रणासाठी रसायनांची तीव्र फवारणी करू नये, त्या ऐवजी या अवस्थेत जैविक कीड व रोग नाशकांचा वापर करावा.
  • फळझाड लागवड हि शिफारस केलेल्या अंतरावरच करावी. तसेच घनपद्धतीने फक्त शिफारस केलेल्या काही फळझाडांचीच लागवड करावी उदा. पेरू, अतिघन पद्धतीने २ × १ मीटर किंवा ३ × २ मीटर अंतरवर घन लागवड करावी. आंबा पिकामध्ये ५ × ५ मीटर अंतरावर घन लागवड करावी, मात्र या घनलागवड पद्धती मध्ये फळे सुरु झाल्यावर छाटणी तंत्र तज्ञांच्या मार्गदर्शखाली करावी अन्यथा कीड व रोगाचा प्रादुर्भाव भविष्यात वाढू शकतो.
  • कृषि हवामान विभागवार शिफारस केलेल्या जमिनीच्या प्रकारानुसारच लागवड करावी. देशातील दुसऱ्या राज्यातील फळझाडे कलमे आणून लागवड करण्यापूर्वी कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञांचा सल्ला घ्यावा.

अश्या प्रकारे शेतकरी बंधूंनी फळबाग लागवडीपूर्वी वरील सूचनांचे पालन करून व्यवस्थापन केल्यास फळबागेचे उत्पादित आयुष्य जास्त मिळून जमिनीचे आरोग्य सुद्धा अबाधित राहील.

लेखक : शुभम दुरगुडे हे मृदविज्ञान आचार्य पदिवीचे विद्यार्थी आहेत. डॉ. अनिल दुरगुडे म. फु. कृ. वी. राहुरी येथील मृदविज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागात कार्यरत आहेत. मो. ९४२०००७७३२ / ९४२०००७७३१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *