पुणे : राज्यातील जिल्हा परिषदांच्या ३०० शाळा ”आदर्श शाळा” म्हणून विकसित करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. राज्यातील प्रत्येक तालुक्यातील एका शाळेची काही निकषांच्या आधारावर निवड करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील १२ शाळांचा यात समावेश करण्यात आला आहे.

निवडलेल्या आदर्श शाळा या इयत्ता पहिली ते सातवी वर्गाच्या जिल्हा परिषदेच्या शाळा असणार आहेत. गरज पडल्यास आठवीचे वर्ग त्याला जोडण्यास वाव असणार आहे. आदर्श शाळांमध्ये भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता आणि काही प्रशासकीय बाबी यांचा समावेश असेल, असे राज्य सरकारने म्हटले आहे. भौतिक सुविधांमध्ये स्वतंत्र शौचालये, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, चांगल्या स्थितीतील वर्ग, आकर्षक इमारत, क्रीडांगण, क्रीडासाहित्य, विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालयांचा समावेश असेल. दळणवळणाची साधने असावीत.

विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी उत्तम शैक्षणिक वातावरण, विद्यार्थ्यांना प्राथमिक स्तरावर भाषा व गणित विषयातील मूलभूत संकल्पना त्यात वाचन, लेखन व गणिती क्रिया अवगत होणे अनिवार्य असणार आहे. शाळेच्या ग्रंथालयांमध्ये निरनिराळी गोष्टींची पूरक पुस्तके संदर्भ ग्रंथ असावेत, अशी आदर्श शाळेची संकल्पना आहे.

आदर्श शाळांमध्ये पुणे जिल्ह्यातील १२ शाळांचा समावेश आहे. आंबेगाव तालुक्यातील थुगाव, बारामतीतील सांगवी, भोरमधील उत्रोली, इंदापूरमधील रुई, दौंडमधील पाटस, जुन्नरमधील बेल्हे, मावळ तालुक्यातील आंबाळे, मुळशीमधील कासार अंबोली, पुरंदर तालुक्यातील सुपे खुर्द, शिरुरमधील मुंजाळवाडी, वेल्हे तालुक्यातील वेल्हे बुद्रुक, खेड तालुक्यातील पाईट शाळेचा समावेश आहे. या शाळांच्या सोयी सुविधांसंदर्भात पाहणी करण्याचे राज्य सरकारने जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.

राज्य सरकारने दिलेल्या निकषांनुसार जिल्ह्यातील तालुक्यांमधील निवड केलेल्या शाळांमध्ये या सोयी सुविधा आहेत की नाही याची शहानिशा करून याचा अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. संबंधित तालुक्यांमधील शाळांची पाहणी करून त्यांचा अहवाल देण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. दोन दिवसांत तो अहवाल सरकारला पाठविला जाईल.
– सुनील कुऱ्हाडे, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *