शुभम दुरगुडे, डॉ. अनिल दुरगुडे

मृदेचे गुणधर्म व त्यावर परिणाम करणारे घटक या संबधीच्या सखोल ज्ञानाचा उलगडा विशेषतः गेल्या दशकात झाला. आजही मुळांच्या सान्निध्यात असलेल्या मृदेविषयीचे रहस्य फारसे उलगडलेले नाही. मुळांच्या सान्निध्यात असलेल्या मृदेमध्ये असंख्य प्रजातींचे सूक्ष्म जीवाणू व मुळांद्वारे पाझरणारी स्रावके असतात. या दोनही गोष्टी मुलपरीवेशाला म्हणजेच रायझोस्फीअर (मुळांच्या सान्निध्यात असलेल्या मातीला) सजीव आणि सक्रीय बनवतात. पिकाच्या वाढीत तसेच उत्पन्नात या दोन्ही गोष्टींचा मोलाचा वाटा असतो. मुलपरिवेशातील मुठभर मातीमध्ये असंख्य प्रक्रीयेंचा परिपाक असतो आणि हीच माती त्यात जन्म घेणाऱ्या प्रत्येक जीवाला परिपूर्ण बनवते.

जैवविविधता जंगलात आढळून येते असंख्य अश्या वनस्पती, झुडुपे, मोठी वृक्षे जंगलात वाढतात. प्रत्येक वनस्पतींच्या मुळाची वाढ ही वेगवेगळ्या प्रकारची असते. ही मुळे जमिनीच्या वेगवेगळ्या थरातून वनस्पतींना नैसर्गिकरित्या अन्नद्रव्ये पुरविण्याचे काम करतात. अश्या वनस्पतींना आपण पाणी, खते टाकत नसतो. परंतु कर्ब चक्रीकरणातून सूक्ष्मजीवाणूंची वाढ व कर्ब विघाटनातून निर्माण झालेले अन्नघटक वनस्पतींना नैसर्गिकरित्या मिळत असतात.

मुळांद्वारे जमिनीत पाझरणारी स्रावके

मुळांद्वारे पाझरणारी स्रावके म्हणजे मुळांद्वारे पाझरणारे घटक व त्यावर सूक्ष्म जीवाणूंनी केलेल्या प्रक्रियेचा परिपाक होय. जमिनीतील विद्राव्य सेंद्रिय पदार्थांचे जटील मिश्रण म्हणजेच ही स्रावके. यामध्ये प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. एक म्हणजे उच्च आण्विक वजन स्रावके उदा. सेल्युलोज व म्युसीलेज आणि दुसरे म्हणजे कमी आण्विक वजन स्रावके उदा. अमिनो आम्ल (ग्लायसिन, हिस्टीडीन, लायसीन, मिथीओनीन प्रोलीन), सेंद्रिय आम्ल (सायट्रिक आम्ल, मॅलिक आम्ल, अँसिटिक आम्ल, ब्युटीक आम्ल, ऑक्झालिक आम्ल, टारटारिक आम्ल, फुमरिक आम्ल), विकरे (अमायलेज, इनव्हरटेज, फॉस्पटेन, प्रोटीयेज) व दुय्यम वनस्पती घटक (फ्लॅवनाइड्स, टरपेनाइडस). हे पदार्थ मुलपरिवेशामध्ये अत्यंत महत्वाची कार्य बजावतात. मुळांना हवे ते अन्न उपलब्ध करून देण्यामध्ये यांचा कमालीचा वाटा असतो.

मुलपरीवेशातील मुळाद्वारे सोडलेल्या स्रावकांची कार्ये

संदेशवहन आणि वनस्पती संप्रेरकांना सक्रीय करणे
जमिनीतील विशिष्ट जीवाणूंना त्यांच्या वसाहती निर्माण करण्यासाठी आवश्यक तो संदेश पोहचवण्याचे काम हि स्रावके करतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या जमिनीत असलेले फ्लेवनाइड्स. हि स्रावके रायझोबीअम या जीवाणूस संदेश देऊन त्याला आकर्षित व सक्रीय करतात परिणामी जमिनीत द्विदल वनस्पतींमध्ये नत्र स्थिरीकरणास मदत होते. मुळातील सर्वात बाहेरच्या म्हणजेच सीमाभागावर असणाऱ्या पेशी विशिष्ट जीवाणूबरोबर संयोग करण्यासाठी काही स्रावके सोडतात.

काही वनस्पतीच्या मुळातील स्रावके उदा. निलगिरी हे मृदाजन्य बुरशीवरती नकारात्मक प्रभाव टाकून मुळांचे रक्षण करतात. अझॅटोबॅकटर या जीवाणूच्या काही प्रजाती मका मुलपरीवेशात अत्यंत सक्रीय होऊन पिकास पोषक असे ऑक्झीन हे संप्रेरक तयार करतात. प्रोलीन सारखे अमिनोआम्ल घटकामुळे वनस्पतींना उन्हाळ्या मध्ये तग धरून ठेवण्याची ताकद मिळते. तसेच स्रावाकातील विकर घटक वनस्पतींना विविध अन्नद्रव्यांचे उपलब्ध स्थितीत रुपांतर करून देतात.

सेंद्रिय आम्लाचे कार्य
मुळांद्वारे पाझरणारे हे सेंद्रिय आम्ल खडकाचा मुरूम, मुरमाची माती होण्यास मदत करतात तसेच मातीतील खनिजांपासून अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध करून देतात. जमिनीतील काही सूक्ष्म अनद्रव्यांच्या चिलेट स्वरुपात बांधून ठेवते व पिकांना हळूहळू उपलब्ध करून देते. त्यामुळे अन्नद्रव्यांचा अपव्यय देखील टळतो. सेंद्रिय आम्ल पिकांना कॅडमिअम सारख्या जड धातूच्या विषारीपणापासूनसुद्धा वाचवते. कडूनिंब वृक्ष कोरड्या, कमी पावसाच्या व चुनखडीयुक्त प्रदेशात चांगले वाढतात तर बाभूळ वृक्ष भारी काळ्या जमिनीत तर इलायती बाभूळ हि कोणत्याही समस्यायुक्त जमिनीत वाढतात. अति पावसाच्या प्रदेशात व जांभ्या खडकापासून तयार झालेल्या जमिनीत काजू, आंबा, फणस, कोंकण नारळ इ. वृक्षे चांगली वाढतात. याचाच अर्थ ह्या वृक्षांच्या मुळामधून स्रावलेल्या घटकांपासून अन्नद्रव्ये घेण्याची किमया विभागनिहाय वेगवेगळी आहे.

जमिनीतील प्रदुषकांचे विघटन करणे
मुळांद्वारे जमिनीत पाझरणारी स्रावाकांमुळे मुलपरीवेशात जीवाणूंची संख्या नेहमी जास्त असते व हेच जीवाणू मृदेच्या प्रदुषकांचे विघटन करून जमिनीचे आरोग्य अबाधित ठेवतात. काही स्रावके अश्या प्रदूषकांचे स्वरूप बदलवून टाकतात त्यामुळे पिकांना कुठलाही धोका रहात नाही.

स्रावकांची इतर कार्ये
अत्यंत विस्तृत श्रेणीतील हि स्रावके मृदेच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मांवरती चांगलाच प्रभाव टाकतात.मुळांचा आणि मृदेचा संपर्क ठेवणे, मुळांच्या टोकावर वंगणाचे कार्य करणे, मुळाला इजा होण्यापासून वाचविणे, जमिनीतील सूक्ष्म संरचनेचे स्थिरीकरण करणे, अन्नद्रव्यांच्या नियंत्रित शोषणात मदत करणे अशी असंख्य कार्य हि स्रावके बजावतात. सेंद्रिय शेतीमध्ये मातीतील अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध करून देण्याचे कार्य हीच स्रावके करतात. हिरवळीचे पिक चवळी घेतल्यास चवळीच्या मुळाद्वारे फुमॅरिक आम्ल मातीत सोडले जाते हे आम्ल जमिनीतील स्थिर स्फुरद उपलब्ध स्थितीत पिकांना उपलब्ध करून देतात.

एकूणच नैसर्गिकरित्या, सेंद्रिय पद्धतीत पिकांना / वनस्पतींना / वृक्षांना अन्नद्रव्ये उपलब्ध करून देण्याचे काम मुळांनी सोडलेल्या स्रावाकाद्वारे केले जाते. सेंद्रिय पदार्थांद्वारे सुद्धा (कर्ब चक्रीकरनाद्वारे) विघटणानंतर त्यामधील असलेल्या मुख्य, दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये स्रोत हि पिकांना मिळतात. म्हणूनच सेंद्रिय शेतीमध्ये आपण जर वेगवेगळ्या सेंद्रिय पदार्थांचा वापर, जैविक खतांचा वापर, पिकांची फेरपालट, अच्छादनाचा वापर , हिरवळीची पिके, भूसुधारके, इत्यादींचा सातत्याने वापर केला तर सेंद्रिय शेतीतून सुद्धा कालांतराने शाश्वत उत्पादन मिळू शकेल.

लेखक शुभम दुरगुडे हे मृद्विज्ञान आचार्य पदिवीचे विद्यार्थी आहेत. डॉ. अनिल दुरगुडे म.फु.कृ.वी. राहुरी येथील मृदविज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागात कार्यरत आहेत) मो. ९४२०००७७३२

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *