ऑक्टोबर हीटचा पिकांना फटका

पुणे : परतीच्या पावसाने राज्याच्या विविध भागात दाणादाण केली असतानाच ऑक्टोबर हीटचा वाढता प्रभाव तापदायक ठरत आहे. सततचा पाऊस त्यात उन्हाचा चटका वाढल्याने पिकांना फटका बसल्याचे दिसून येत आहे. काढणीस आलेली खरीप पिके, नुकतीच पेरणी झालेली रब्बी पिके, कांदा रोप वाटिकांना या बदलाचा फटका बसत आहे. पिकांवर कीड रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीमुळे गेल्या आठवड्यात राज्यात दमदार पाऊस पडला. विशेषतः मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणाच्या दक्षिण भागातील जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला. काढणीस आलेल्या सोयाबीन, मका, भात, कापूसासह खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यापाठोपाठ ‘ऑक्टोबर हीट’ वाढल्याने तापमान ३० ते ३६ अंशादरम्यान पोचले आहे. बाष्पामुळे हवेतील दमटपणा वाढला आहे. परिणामी सोयाबीन, मका, भूईमुग या सारख्या पिकांना मोड येण्यास सुरवात झाली आहे.

पिकांवर कीड रोगाचे वाढ होत आहे. जमीनीत बुरशीची वाढ होत आहे. पहाटेच्या वेळी पडणारे दव, उन्हाचा वाढलेला चटका, पावसाची हजेरी यामुळे कांदा रोपवाटिकांसह, रब्बीच्या कोवळ्या पिकांवर परिणाम होत असून, रोपांची मर होण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. पुढील काही दिवस ही स्थिती राहिल्यास पेरणी झालेल्या भागात दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची भिती आहे.

तापमान वाढते त्यावेळी बाष्पीभवनाचा वेग वाढतो. बियाणे रूजण्यासाठी हे हवामान पोषक असते. त्याचवेळी पाऊस झाल्यास ओलावा मिळून पिकांसाठी पोषक हवामान असते. ऑक्टोबर हीटच्या कालावधीत तापमान ३५ ते ३८ अंशांपर्यत वाढते. हे तापमान जास्त नसलेतरी सुर्यकिरण थेट जमीनीवर येतात. सध्या उन्हाचा चटका वाढला असल्याने जमिनीतून पाण्याची वाफ बाहेर पडते. पालेभाज्या, कांदा रोपे, उगवून आलेली पिकांचे कोवळे कोंब यांसाठी हे तापमान घातक ठरते. त्यामुळे शेतकऱ्यांनी भर उन्हात चटका असताना पीकाला पाणी न देता, शक्यतो सायंकाळी उशीरा पाणी द्यावे. दुपारी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असा सल्ला ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिला आहे.

अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी हिवाळी कांदा हंगामासाठी रोपे टाकण्यास सुरूवात झाली आहे. सतत पडणारा पाऊस आणि वाढलेले तापमान यामुळे जमीनीत बुरशीची वाढ होत आहे. त्यामुळे रोपांमध्ये मर होण्याचे प्रमाण अधिक असल्याने नुकसान होणार आहे. त्यामुळे कांदा हंगामात शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. चढ्या दराने बियाणे खरेदी करून पुन्हा कांदा बियाणे टाकावे लागणार आहे.
– अजित घोलप, शेतकरी, रोहकडी, ता. जुन्नर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!