राजेश डवरे, कीटकशास्त्रज्ञ

कपाशी पिकावर गुलाबी बोंड आळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते. शेतकऱ्यांनी या कीडी संदर्भात कपाशी पिकात वेळोवेळी सर्वेक्षण करून जागरूक राहणे गरजेचे आहे शेतकरी बंधूंनी वेळोवेळी कपाशी पिकात निरीक्षणे घेऊन योग्य निदान करून आवश्यकतेनुसार कपाशीवरील गुलाबी बोंड अळी संदर्भात खालील व्यवस्थापन योजना अमलात आणाव्यात.

  • कपाशी पिकात ताबडतोब गुलाबी बोंड अळीच्या पर पतंगांना मोठ्या प्रमाणात सापळ्यात अडकून त्यांचा नाश करण्यासाठी व सनियंत्रणासाठी प्रती एकर की आठ ते दहा कामगंध सापळे गॉसिल्योर (Gossilure) किंवा पेक्टिनोल्योर (Pectinolure) या गुलाबी बोंड अळीच्या कामगंध गोळी सह म्हणजेच ल्योर (Lure) सह पिकाच्या उंचीच्या वर एक ते दीड फूट उंची ठेवून लावावेत. या सापळ्यात मादी पतंगाच्या वासामुळे गुलाबी बोंड अळीचे नर पतंग आकर्षिले जाऊन अडकून पडतात.
  • या सापळा मध्ये जमा झालेले नर पतंग दररोज काढून मोजून मारावेत. या सापळ्यात सरासरी आठ ते दहा गुलाबी बोंड अळीचे नर पतंग सतत दोन ते तीन दिवस आढळून आल्यास गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी योग्य ते उपाय योजावेत.
  • कपाशी पिकात फुलाच्या अवस्थेत न उमललेल्या गुलाबाच्या कळी सारख्या डोम कळ्या म्हणजे गुलाबी बोंड आळीग्रस्त फुले आढळल्यास दर आठवड्यात पिकांमध्ये मजुराच्या साह्याने अशा डोम कळ्या शोधून नष्ट कराव्यात.
  • ट्रायकोग्रामा चीलोनिस या परोपजीवी मित्रकीटकांची अंडी असलेले कार्ड म्हणजे ट्रायकोकार्ड प्रति एकर ३ कार्ड म्हणजेच ट्रायकोग्रामा या मित्रकीटकांची साठ हजार अंडी प्रती एकर याप्रमाणे कपाशीला पात्या लागल्यापासून सात ते आठ वेळा पिकांमध्ये दर दहा दिवसानंतर पानाच्या मागच्या बाजूने लावावे म्हणजे सर्व प्रकारच्या बोंड आळीचे अंडी अवस्थेत व्यवस्थापन मिळू शकते.
  • मोनोक्रोटोफास, ॲसीफेट या सारख्या मध्यम ते खूप विषारी कीटकनाशकाचा कपाशीच्या सुरुवातीच्या अवस्थेत फवारणीसाठी वापर टाळावा त्यामुळे शत्रु किडींवर जगणाऱ्या मित्र किडींचा नाश होऊन कपाशी सुरुवातीच्या अवस्थेत लुसलुशीत होऊन तिची अतिरिक्त कायिक वाढ होऊ शकते व त्यामुळे कपाशी वर शत्रु किडींचा प्रादुर्भाव वाढू शकतो.
  • कपाशी पीक पात्या फुले व बोंडे भरण्याच्या अवस्थेत असताना सुरुवातीला पाच टक्के निंबोळी अर्क किंवा आझॅडीरेक्टीन (Azadirechtin) ०.०३ टक्के (३०० पीपीएम) ५० मिली किंवा आझॅडीरेक्टीन ०.१५ टक्के (१५०० PPM) २५ मिली किंवा उच्च आद्रता असल्यास बिव्हेरिया बॅसियाना (Beveria basiana) १.१५ टक्के पी हे जैविक कीटकनाशक ५० ग्रॅम अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन कोणत्याही एका बाबीची निर्देशीत प्रमाणात घेऊन फवारणी करावी.
  • कपाशीवर गुलाबी बोंड अळी ने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असेल तर म्हणजेच पाच टक्के याच्यावर गुलाबी बोंड आळी ग्रस्त फुले किंवा बोंडे किंवा त्यापेक्षा जास्त प्रादुर्भाव आढळल्यास खालीलपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची निर्देशीत प्रमाणात फवारणी करावी.

क्लोरोपायरीफॉस (Chloropyrifos) २०% प्रवाही २५ मिली अधिक दहा लिटर पाणी
किंवा
प्रोफेनोफोस (Profenofos) ५०% प्रवाही ३० मिली अधिक दहा लिटर पाणी
किंवा
थायोडीकार्ब (Thiodicarb) ७५ टक्के डब्ल्यू पी २० ग्रॅम अधिक दहा लिटर पाणी

या प्रमाणात घेऊन वर निर्देशित कीटकनाशक यापैकी गरजेनुसार कोणत्या एकाची फवारणी करावी.

वर निर्देशित फवारणी करून सुद्धा गुलाबी बोंड अळीचा १० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त प्रादुर्भाव आढळून आल्यास गरजेनुसार खालील पैकी कोणत्या एका कीटकनाशकाची आवश्‍यकतेनुसार फवारणी करावी.


डेल्टामेथ्रीन (Deltamethrin)१ टक्का + ट्रायझोफॉस (Trizophos) ३५ % प्रवाही या संयुक्त कीटकनाशकाची १२.५ मिली अधिक दहा लिटर पाणी
किंवा
क्लोरोपायरीफॉस (Chloropyrifos) ५० टक्के + सायपरमेथ्रीन (cypermethrin) ५ टक्के प्रवाही हे संयुक्त कीटकनाशक १० मिली अधिक दहा लिटर पाणी
किंवा
क्लोरानट्रानिप्रोल (Chlorantraniprole) ९.३ टक्के + लॅम्बडा सायलोहाथ्रीन ४.६ झेडसी (Lambda Cylohathrine 4.6 ZC) हे संयुक्त कीटकनाशक पाच मिली अधिक दहा लिटर पाणी

या प्रमाणात घेऊन कोणत्याही एका कीटकनाशकाची निर्देशीत प्रमाणात घेऊन फवारणी करावी.

टीप :

  • वर निर्देशित रसायने वापरण्यापूर्वी लेबल क्लेम शिफारशीची शहनिशा करून संबंधित किडीचे योग्य निदान करून आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर आवश्यकतेनुसार तज्ञांचा सल्ला घेऊन रसायनाचा लेबल क्लेम शिफारशीप्रमाणे वापर करावा.
  • रसायने फवारताना किंवा कीडनाशके फवारणी करताना अनेक रसायनाचे एकत्र मिश्रण करून फवारणी करणे टाळावे व प्रमाण पाळावे.
  • कीडनाशके फवारताना विषबाधेचा प्रतिबंध करण्याकरता सुरक्षित कीडनाशक वापर तंत्राचा अंगीकार करावा व सुरक्षा किट वापरूनच फवारणी करावी.

लेखक : राजेश डवरे हे कृषी विज्ञान केंद्र, करडा, जि. वाशिम येथे कीटकशास्त्रज्ञ आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *