रांगडा कांदा पिकाच्या लागवडीचा हंगाम सुरु आहे. या वर्षीच्या खरिप व रागंडा हंगामात रोपांची जास्त पावसामुळे हानी झाली. परंतु ज्या शेतकरी बंधूंनी बियाणांची पेरणी नर्सरीत गादी वाफ्यावर ओळीत केली त्यांच्या कांदा रोपांची चांगली वाढ झाली आहे. कांदा पिकासाठी रांगडा (सप्टेंबर – ऑक्टोबर) आणि रब्बी हंगामात (नोव्हेबर – डिसेबर) एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापनामध्ये सेंद्रिय खतांचा वापर, जैविक खतांचा वापर, माती परीक्षणानुसार अन्नद्रव्यांचा संतुलित वापर, जमिनीच्या प्रकारानुसार खतांची निवड, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा कमतरतेनुसार वापर केल्यास कांद्याचे गुणवत्तापूर्ण उत्पन्न मिळते व कांद्याची टिकवण क्षमता वाढते.

सेंद्रिय खतांचा वापर

कांदा जमिनीत वाढ होत असल्याने जमीन उत्तम निचऱ्याची, घडण भुसभुशीत होण्यासाठी सेंद्रिय खताचा वापर लागवडीपूर्वी १५ दिवस अगोदर जमिनीत मिसळावे. उदा. शेणखत किंवा कंपोष्ट खत एकरी १० टन किंवा गांडूळखत एकरी २ टन. ज्या शेतकरी बंधूंना कांदा काढणीच्या वेळी कांदा मूळकुज किंवा कांदा चाळीत सडणे असा पूर्वीचा अनुभव असेल तर त्यांनी याच सेंद्रिय खतात एकरी १ किलो ट्रायकोडर्मा पावडर मिसळावी. म्हणजे असे बुरशीजन्य रोग भविष्यात टाळता येतील.

जैविक खतांचा वापर

नर्सरीत बियाणास अॅझोस्पीरीलम व स्फुरद विरघळणारे जीवाणू (पी एस बी) प्रत्येकी २५ ग्रॅम प्रती किलो बियाणास चोळावे किंवा लागवडीपूर्वी सुद्धा याच जीवाणू खतांची रोपे मुळे बुडवून लागवड करावी. (एकरी २५० ग्रॅम प्रती १० लिटर पाणी)

माती परीक्षणानुसार अन्नद्रव्यांचा संतुलित वापर

कांद्यासाठी नत्र, स्फुरद व पालाश ही मुख्य अन्नद्रव्ये संतुलित प्रमाणात दिल्यास कांद्याच्या पातीची अतिवाढ किंवा मान जाड होणे व लांबणे तसेच कांदा फुगवण न होणे, कांदा चाळीत टिकवण क्षमता कमी होणे या सर्व बाबी पिक वाढीच्या तसेच साठवण काळात दिसून येणार नाहीत. उपलब्ध नत्र, स्फुरद व पालाश यांचे जमिनीत प्रमाण कमी असेल तर शिफारस खत मात्रा २५ % ने जास्त द्यावे, जमिनीत उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण मध्यम असेल तर शिफारस अन्नद्रव्ये मात्रा आहे तशी द्यावी, मात्र ही अन्नद्रव्ये जमिनीत जास्त प्रमाणत असेल तर शिफारस खत मात्रा २५ % ने कमी करावी. एकूणच कांद्यासाठी शिफारस खत मात्रा एकरी २० किलो नत्र, २० किलो प्रत्येकी स्फुरद व पालाश लागवडीच्या वेळी द्यावे (५० % नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश ). उर्वरित ५० % नत्राची २० किलो मात्रा विभागून ३० व ४५ दिवसांनी जमिनीतून द्यावी. त्यानंतर रासायनिक खतांचा वापर करू नये.

जमिनीच्या प्रकारानुसार रासायनिक खतांचा वापर

शिफारस केलेली अन्नद्रव्ये ही रासायनिक खतातून जमिनीच्या प्रकारानुसार द्यावी उदा. जमीन चूनखडीयुक्त (भुरकट रंगाची) असेल तर एकरी एक बॅग १८ : ४६ : ० (डी ए पी) किंवा २४ : २४ : ० किंवा २० : २० : ० : १३ या खतांचा वापर करावा. मात्र या खातात पालाश नसल्यामुळे एकरी १ बॅग म्युरेट ऑफ पोटॅश किंवा सल्फेट ऑफ पोटॅश वरील रासायनिक खातात मिसळावे. म्हणजे कांदा टिकवण क्षमता वाढते. तसेच लागवडीनंतर नत्रासाठी अमोनिअम सल्फेट एकरी १ बॅग प्रत्येकी ३० व ४५ दिवसांनी द्यावे. जमीन तांबडी किंवा काळ्या रंगाची असेल तर लागवडीच्या वेळी एकरी १ बॅग युरिया, २.५ बॅग सिंगल सुपर’ फॉस्फेट, १ बॅग म्युरेट ऑफ पोटॅशद्वारे द्यावे व लागवडीनंतर अर्धी बॅग युरिया प्रत्येकी ३० व ४५ दिवसांनी द्यावे. क्षारयुक्त जमिनीत (जमिनीच्या पृष्ठभागावर पांढरे क्षार जमा होतात) एकरी लागवडीच्या वेळी २ बॅग १० : २६ : २६ किंवा १५ : १५ : १५ आणि लागवडीनंतर अर्धी बॅग युरिया प्रत्येकी ३० व ४५ दिवसांनी द्यावा.

दुय्यम अन्नद्रव्यांचा वापर

जमीन तांबडी , अति निचऱ्याची असेल तर भूसुधारक म्हणून जिप्सम (एकरी १०० किलो) किंवा कॅल्शीअम : मॅग्नेशीअम : गंधकयुक्त दुय्यम खत बाजारात उपलब्ध असून लागवडीपूर्वीच जमिनीत १५ दिवस अगोदर मिसळावे. तसेच भुरकट चूनखडीयुक्त जमिनीत लागवडीच्या वेळी बेसल डोस मध्ये एकरी २० किलो गंधक शेण खतात मिसळून जमिनीत टाकावे. काळ्या चोपण जमिनीत लागवडीपूर्वी एक महिना अगोदर प्रेसमड कंपोस्ट १ टन प्रती एकर जमिनीत मिसळावे.

सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर

माती परीक्षणानुसार माती मध्ये लोहाची कमतरता असल्यास (४.५ पीपीएम पेक्षा कमी) फेरस सल्फेट एकरी १० किलो द्यावे. जस्ताची कमतरता असल्यास (०.६ पीपीएम पेक्षा कमी) झिंक सल्फेट एकरी ८ किलो द्यावे. ही खते शक्यतो कुजवलेल्या शेणखतात किंवा सेंद्रिय खातात आठ दिवस मुरवून लागवडीच्या वेळी जमिनीतून दिल्यास कांद्याची गुणवत्ता व टिकवण क्षमता वाढते.

फवारणीद्वारे अन्नद्रव्यांचे नियोजन

उभ्या कांदा पिकात पात पिवळी पडणे, पात वेडीवाकडी वेणीसारखी दिसून आल्यास चीलेटेड जस्त व चिलेटेड लोह प्रत्येकी १० ग्रॅम हे १० लिटर पाण्यात मिसळून आठ दिवसाच्या अंतराने दोनदा फवारावे किंवा कांदा लागवडीनंतर ३० व ४५ दिवसांनी फुले द्रवरूप मायक्रो ग्रेड २ ची १०० मिली प्रती १० लिटर पाण्यातून फवारणी करावी. तसेच पातीची वाढ जास्त दिसून आल्यास अडीच महिन्यानंतर ० : ० : ५० या विद्राव्य खताची फवारणी करावी (१०० ग्रॅम / लिटर) अश्या प्रकारे येत्या रांगडा व रब्बी हंगामात वरील प्रमाणे कांदा पिकास एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन केल्यास टिकवण क्षमता व गुणवत्ता असलेले कांदा उत्पादन शेतकरी बंधूंना घेता येईल.

लेखक : शुभम दुरगुडे हे मृदविज्ञान आचार्य पदवीचे विद्यार्थी आहेत. डॉ. अनिल दुरगुडे हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे मृदविज्ञान विभागात मृद शास्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. भ्रमणध्वनी – ९४२०००७७३२, sdurgude0038@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *