आयुष्यमान सहकार योजनेतून होणार कर्ज पुरवठा

नवी दिल्ली : केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाअंतर्गत असलेल्या राष्ट्रीय सहकारी विकास निगमच्या माध्यमातून (एनसीडीसी) ‘आयुष्यमान सहकार’ ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतून सहकारी संस्थांना आरोग्य सेवेच्या पायाभूत सुविधांसाठी १० हजार कोटी रूपयांचा कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे.

देशातील आरोग्य सेवेच्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी सहकारी क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्यासाठी सहाय्य करण्यास केंद्रीय कृषि राज्य मंत्री परषोत्तम रूपाला १९ ऑक्टोबर २०२० रोजी “आयुष्मान सहकार” ही योजना सुरू केली. श्री. रूपाला म्हणाले, सध्या सुरू असलेल्या साथीच्या रोगाने अधिकाधिक सुविधा निर्माण करण्याची गरज लक्षात येत्या काही वर्षांत सहकारी संस्थांना १० हजार कोटींची मुदत कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही योजना शेतकरी कल्याणकारी कामांना बळकटी देण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल असेल.

देशभरात सहकारी संस्थांकडून सुमारे ५२ रुग्णालये चालवली जातात आणि यामध्ये ५,००० हुन अधिक बेडची सोय असल्याची माहिती एनसीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. संदीप नायक यांनी दिली आणि एनसीडीसीचा हा निधी सहकारी संस्थांच्या आरोग्य सेवांच्या तरतूदीस चालना देईल हे स्पष्ट केले.

योग्य तरतूद असलेली कोणतीही सहकारी संस्था आरोग्य सेवे संबंधी उपक्रम राबविण्यासाठी एनसीडीसीच्या या योजेनेचा लाभ घेऊ शकेल. एनसीडीसीचे सहाय्य हे राज्य सरकार / केंद्र शासित प्रदेश प्रशासनाद्वारे किंवा थेट पात्र सहकारी संस्थेला दिले जाईल. त्याशिवाय इतर स्त्रोतांकडून याउपक्रमासाठी अनुदान दिले जाऊ शकते.

आयुष्मान सहकार मध्ये विशेषत: उभारणी, आधुनिकीकरण, विस्तार, दुरुस्ती, रुग्णालयाचे नूतनीकरण व आरोग्य सेवा व शैक्षणिक पायाभूत सुविधा समाविष्ट केल्या आहेत. ही योजना सहकारी संस्थाच्या परिचालन गरजा पूर्ण करण्यासाठी खेळते भांडवल उपलब्ध करून देणार आहे. महिला बहुसंख्य सहकारी संस्थांना या योजने अंतर्गत १% व्याज अनुदान देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!