बंगालच्या उपसागरात होतेय कमी दाब क्षेत्राची निर्मिती

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा (मॉन्सून) प्रवास सुरू झाला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेली वादळी प्रणाली महाराष्ट्राकडे आल्याने राज्यात परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. सोमवारी (ता. १९) बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. हे क्षेत्र पोषक ठरल्याने गुरूवारपर्यंत (ता.२२) राज्याच्या विविध भागात विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

देशाच्या संपुर्ण वायव्य भागासह उत्तर भारतातील बहुतांशी भागातून मॉन्सून परतला आहे. २८ सप्टेंबर रोजी पश्चिम राजस्थानमधून परतीचा प्रवास सुरू करणाऱ्या मॉन्सूनने ६ ऑक्टोबरपर्यंत संपुर्ण राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, अरबी समुद्राच्या काही भागातून माघार घेतली. मात्र त्यानंतर मॉन्सूनचा परतीचा प्रवासाची वाटचाल थांबली आहे.

बंगालच्या उपसागरातील कमी तीव्रतेचे वादळ (डीप डिप्रेशन) महाराष्ट्राकडे आली. जमीनीवर येताच या प्रणालीची तीव्रता कमी झाली. मात्र अरबी समुद्रातून बाष्पाचा पुरवठा झाल्याने कोकण, दक्षिण महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिण भागात अतिवृष्टी झाल्याने खरीपासह, फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

अरबी समुद्रात जाताच या वादळी प्रणालीची तीव्रता वाढली. मात्र ती पश्चिमेकडे खोल अरबी समुद्रात सरकून गेली. यामुळे कोकण किनारपट्टीवर पाऊस पडला, मात्र उर्वरीत राज्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. दरम्यान सोमवारी (ता. १९) बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाब क्षेत्राची निर्मिती होणार असून, त्याची तीव्रता वाढण्याचे संकेत आहेत.

दरम्यान कर्नाटक किनाऱ्यापासून बंगालच्या उपसागरापर्यंत वाऱ्यांचे पूर्व पश्चिम जोडक्षेत्र (इस्ट वेस्ट शेअर झोन) सक्रीय असल्याने दक्षिण भारतातील राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. महाराष्ट्रातही सर्वदूर मेघगर्जना विजांसह हलक्या ते जोरदार सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *