शेवळा

शास्त्रीय नाव – ऍमोरपोफॅलस कम्युट्यॅटस (Amorphophallus Commutatus)
कुळ – ऍरेसी (Araceae)
इंग्रजी नावे – ड्रॅगन स्टॉक याम (Dragon Stalk Yam).
शेवळा ही वर्षायू, कंदवर्गीय वनस्पती आहे. महाराष्ट्रामध्ये शेवळा वनस्पती कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र व अकोला येथील जंगलात आढळते.

शेवळ्याचे औषधी गुणधर्म

  • शेवळ्याचा कंद औषधात वापरतात.
  • कंदाची पाने दूध आणि साखरेबरोबर वाजीकरणासाठी देतात. यामुळे मूत्रमार्गास उत्तेजन येते.
  • शेवळ्याचे कंद व कोवळी पाने भाजीसाठी वापरतात.
  • शेवळा थोडा खाजरा असतो, म्हणून सोबत काकड (Garuga pinnata) या वनस्पतीची आंबट फळे घालतात.
  • शेवळा भाजी पौष्टिक असते.

शेवळ्याच्या कंदाची भाजी

साहित्य
शेवळाचे कंद, शेंगदाणे, हरभरा डाळ, चिंचेचा कोळ, डाळीचे पीठ, गूळ, तिखट, मीठ, काळा मसाला, ओले खोबरे, हिंग, मोहरी, हळद इ.
कृती

  • शेंगदाणे व हरभऱ्याची डाळ भिजवून नंतर शिजवून घ्यावे.
  • साल काढलेल्या कंदाचे चिरून तुकडे करावेत.
  • ते पाण्याने धुतल्यानंतर शिजवून पाणी काढून घोटून घ्यावेत.
  • त्यात थोडे डाळीचे पीठ घालावे. नंतर त्यात भाजीचे पाणी घालावे.
  • चिंचेचा कोळ, गूळ, तिखट, मीठ, काळा मसाला घालून पळीवाढी भाजी करावी.
  • ओले खोबरे घालावे. वरून तेलामध्ये हिंग, मोहरी, हळद घालून फोडणी द्यावी.
  • काही ठिकाणी ही भाजी तांदळाच्या धुवणात शिजविण्याची पद्धत आहे.

शेवळ्याच्या पानांची भाजी

साहित्य
शेवळ्याची कोवळी पाने, मूगडाळ, लाल मिरच्या, आमसुले, दाणेकुट, नारळ चव, गूळ, मीठ, तेल, हिंग, मोहरी, हळद, तिखट इ.

कृती

  • शेवळ्याची कोवळी पाने धुऊन बारीक चिरावीत.
  • आमसुले पाण्यात भिजत ठेवावीत. तेलाच्या फोडणीत लाल मिरच्या व मूगडाळ घालावी.
  • थोड्या वेळाने चिरलेली पाने घालावीत. नंतर आमसुलाचा कोळ घालावा.
  • मीठ, तिखट, गूळ घालून भाजी शिजवावी, नंतर दाणेकूट व नारळचव घालावा.

सौजन्य : रानभाज्यांची माहिती पुस्तिका, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन, विकासपिडीया.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *