हरभरा (चना)

शास्त्रीय नाव : सिझर एरिटिनम (Cicer arietinum)
इंग्रजी नाव : बेन्गॉल ग्रॅम, चिक पी (Bengal Gram, Chickpea)
कुळ : लेग्युमिनोजी (Leguminosity)
हरभऱ्यात जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात. जेवणामध्ये हरभऱ्याचा कोवळा पाला, पीठ व डाळ याचा भरपूर उपयोग करतात. हरभऱ्याच्या कोवळ्या शेंड्याचा (पानांचा) उपयोग भाजीसाठी करतात.

औषधी गुणधर्म

  • हरभऱ्याची हिरवी मिळणारी आम उत्तम औषधी असून त्यामध्ये मॉलिक असिड (९० ते ९५ टक्के) ऑक्झालिक असिड (५ ते १० टक्के)असतात. ही आम वांत्या (ओकारी), अग्निमांद्य, अपचन, पटकी, अमांश व संधिभंग होते यावर शिजवलेल्या पानांचा लेप अत्यंत गुणकारी असतो.
  • हरभरा हा स्नायूंना बल देणारा आहे. त्यास ‘घोडे का खाना’ असे म्हटले जाते. तरुणांना शरीर कमवायचे असेल तर हरभरा हे स्वस्त आणि मस्त प्रोटिन फुड आहे.
  • हरभऱ्यातील प्रथिने मिळवायची असल्यास त्यास भाजून किंवा वाफवून घ्यावे. तसेच प्रथिनांची साखळी पूर्ण होण्यासाठी हरभरा हा दही, ताक, पोळी, भाकरी किंवा भाताबरोबर खाल्लेला चांगला.
  • हरभरा डाळ ही बल प्रदान करणारी डाळ आहे. प्रथिने, ब- जीवनसत्व व अनेक क्षारांनी ती परिपूर्ण आहे. वयात आलेली मुले, क्रीडापटू, कष्टकरी माणसे, शरीरसौष्ठव संपादन करण्यासाठी हरभरा डाळ ही उत्तम स्नायूवर्धक आहे. नित्यनेमाने व्यायाम करणाऱ्यांनी हरभरा डाळीचे पदार्थ सांडगे, पिठले, घावन, भजी इत्यादी यथेच्छ खावेत.
  • हरभरा डाळ पचण्यास जड, किंचित उष्ण असून तुरट, गोड चवीची आहे. वातदोष वाढवणारी आहे. त्यामुळे वातप्रकृतीच्या व्यक्तींनी, वात व्याधींनी पीडित रुग्णांनी याचे सेवन करू नये. पचनशक्ती मंद असणाऱ्यांनी, अपचनाचा त्रास होणा-या लोकांनी हरभरा डाळीचे, हरभरा पिठापासून बनवलेले पदार्थ सेवन करणे टाळावे.
  • हरभरा रात्रभर भिजत टाकून सकाळी मधाबरोबर खाल्ल्यास ते एक उत्तम टॉनिक आहे. भिजत घातलेल्या चण्याचे पाणीही अत्यंत पौष्टिक असते.
  • मोड आलेल्या हरभ-यात बी कॉम्प्लेक्स व इतर जीवनसत्वे विपुल असतात.
  • नेहमी हरभरे खाण्याने मधुमेही व्यक्तींची इन्सुलिनची गरज कमी होते. लघवीतून जाणाऱ्या साखरेचे प्रमाणही घटते.
  • हरभऱ्याच्या ताज्या पानांत लोह भरपूर असते. म्हणून लोहाच्या कमतरतेमुळे होणाऱ्या रक्तक्षयावर ही पाने अत्यंत चांगली आहेत. या पानांचा चमचाभर रस मधात मिसळून घ्यावा.
  • अकाली रेतस्खलन व वंध्यत्व यावर दोन चमचे डाळीचे पीठ, थोडी साखर, खजूर वाटून व साय काढलेल्या दुधाची पावडर असे मिश्रण करून घ्यावे, फायदा होतो.
  • डाळीचे पीठ त्वचेला लावल्यास डाग जाऊन त्वचा गोरी व कांतीमान होते. इसब, सांसर्गिक त्वचारोग, खरूज यावर हे पीठ उपकारक असते. मुरमेही जातात. यासाठी पीठ दह्यात भिजवावे व त्याचा लेप चेह-यावर देऊन थोडा वेळ ठेवावा.
  • चण्याच्या पिठाने केस धुतल्यास ते मऊ व स्वच्छ होऊन केसाचे रोग होत नाहीत. अंगाला घाम जास्त येत असल्यास, त्याला दुर्गंधी येत असल्यास स्नानाच्या वेळी अंगाला हरभरा डाळीचे पीठ लावल्यास स्वेद प्रवृत्ती व स्वेद दुर्गंधी कमी होते
  • हरभऱ्याच्या पानांचा रस आठ चमचे व शहाळ्याचे पाणी हे मिश्रण रोज सकाळी रिकाम्यापोटी पाजल्यास लहान मुलांमध्ये जंतामुळे होणाऱ्या उलट्या कमी होतात.
  • सुके हरभरेसुद्धा भाजून गुळाबरोबर खाल्ल्यास अत्यंत पौष्टिक असतात.
    भाजलेले चणे खाल्याने वारंवार होणारी सर्दी कमी होण्यास मदत होते.

हरभऱ्याच्या पानांची भाजी

साहित्य
दोन कप हरभऱ्याचा कोवळा पाला, अर्धी वाटी मटार (ऐच्छिक), तेल, मोहोरी, हिंग, हळद, लसूण, हिरव्या मिरच्या, ओला नारळ, चवीपुरते मीठ, साखर

कृती

  • हरभऱ्याचा पाला स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावा.
  • कढईत तेल गरम करून त्यात लसणीच्या ठेचलेल्या पाकळ्या घालाव्यात.
  • लसूण लालसर झाली कि मोहोरी, हिंग, हळद, मिरच्या घालून फोडणी करावी.
  • त्यात मटार घालावेत.आच मंद करून कढईवर झाकण ठेवून मटार अर्धवट शिजू द्यावे.
  • नंतर चिरलेला पाला घालून मध्यम आचेवर भाजी परतावी.
  • भाजी आळली कि आवडीनुसार नारळ मीठ आणि साखर घालावी.

सौजन्य : रानभाज्यांची माहिती पुस्तिका, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन, मराठी विश्वकोश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *