हादगा

शास्त्रीय नाव : sesbania grandiflora (सेस्बॅनिया ग्रँडिफ्लोरा)
कूळ : Fabaceae (फॅबेसी)
स्थानिक नाव : हादगा, अगस्ता
हादग्याला सप्टेंबर ते जानेवारी महिन्यात फुले व फळे येतात. फुलांची व कोवळ्या शेंगांची भाजी करतात.

औषधी गुणधर्म

  • हादग्याच्या खोडाची साल, पाने व मूळ औषधात वापरतात.
  • अनार्तवांत फुलांची भाजी उपयुक्त आहे. फुफ्फुस सुजून ज्वर, कफ ही चिन्हे असतात, अशा वेळी हादग्याच्या मुळाची साल विड्याच्या पानातून किंवा तिचा अंगरस मधाबरोबर देतात.
  • पाने ठेचून व्रणावर बांधल्यास त्याची शुद्धी व रोपण होते. ठेचाळलेल्या भागावर पानांचा लेप करतात.
  • दृष्टी कमी झाल्यास फुलांचा रस डोळ्यात घालतात. संधिशोथात मुळाचा लेप करतात.
  • वातदोष कमी होण्याकरिता, तसेच कफ व पित्तदोषही साम्यावस्येत आणण्यासाठी हादग्याच्या फुलांच्या भाजीचा चांगला उपयोग होतो.
  • चार-चार दिवसांनी थंडी वाजून येणाऱ्‍या तापावर हादग्याच्या फुलांची भाजी उपयुक्त आहे.
  • वरचेवर होणाऱ्‍या सर्दीचा त्रास या भाजीच्या तिखट गुणधर्माने कमी होतो.
  • भूक लागत नसल्यास, पोट साफ होत नसल्यासही हादग्याच्या भाजीने चांगला गुण येतो.
  • ज्या स्त्रियांची पाळी अनियमित होते, अंगावरून कमी जाते, पाळीच्या दिवसांत कंबर, ओटीपोटी दुखते अशा तक्रारी या भाजीच्या सेवनाने कमी होतात.
  • ‘अ’ या जीवनसत्त्वाअभावी रातांधळेपणा निर्माण होतो. यामध्ये रोग्यास संध्याकाळ झाली की दिसावयाचे पूर्णपणे बंद होते, अशा वेळी या भाजीचे नियमित सेवन केल्यास रुग्णाचा त्रास कमी होतो.

हादगा फुलांची भाजी

साहित्य
हादग्याची फुले, भिजवलेली मूगडाळ, कांदा, तेल, फोडणीचे साहित्य, मीठ, गूळ, तिखट, भाजलेले खोबरे व खसखस इ.
कृती

  • फुले स्वच्छ धुऊन ती बारीक चिरावीत.
  • फोडणीत भिजवलेली मूगडाळ, चिरलेला कांदा चांगला परतून घ्यावा.
  • नंतर त्यावर चिरलेली फुलं टाकून परतावीत.
  • शिजत आल्यानंतर मीठ, गूळ, तिखट, खोबरे घालून तीन-चार वाफा आणाव्यात.
  • कांदा आवडीनुसार घालावा. तयार झालेल्या भाजीत भाजलेले खोबरे व थोडी भाजलेली खसखस घालावी.
  • हीच भाजी शिजवल्यानंतर वरून थोडे डाळीचे पीठ लावून परतूनही तयार करतात.

सौजन्य : रानभाज्यांची माहिती पुस्तिका, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन, विकासपेडिया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *