भोकर

शास्त्रीय नाव – कॉर्डिया डायचोटोमा (Cordia dichotoma)
कुळ – बोऱ्याजिनेएसी (Boraginaceae)
स्थानिक नावे – बारगुंड, गुंदन
इंग्रजी नावे – क्‍लामीचेरी, सॅबॅस्टन प्लम, ( Clammy cherry, Sebastian Palm)
भोकर ही वनस्पती भारतात कोरड्या पानझडी तसेच ओलसर मोसमी जंगलात सर्वत्र आढळून येते. महाराष्ट्रातही सर्वत्र आढळते. पश्‍चिम घाट, सातपुडा, कोकण सर्व ठिकाणी भोकरीचे वृक्ष नैसर्गिकपणे जंगलात वाढलेले असतात.

औषधी गुणधर्म

  • भोकरीचे फळ कृमिनाशक, कफोत्सारक व खोकल्यापासून आराम देणारे आहे.
  • फळ मूत्रवर्धक व सारक गुणधर्माचे आहे.
  • कोरडा खोकला, छाती, गर्भाशय व मूत्रनलिकेचे रोग, पित्तप्रकोप, दीर्घकालीन ताप, तहान कमी करणे, मूत्र जळजळ, जखम व व्रण भरण्यासाठी भोकरीचे फळ उपयुक्त आहे.
  • सांधेदुखी, घशाची जळजळ यासाठीही भोकरीचे फळ उपयोगी आहे.
  • साल – भोकरीची साल संग्राहक व पौष्टिक आहे. भोकरीची साल स्तंभक असल्याने फुफ्फुसांच्या सर्व रोगात उपयुक्त आहे.
  • सालीचा रस खोबरेल तेलाबरोबर आतड्याच्या व पोटाच्या दुखण्यावर उपयुक्त आहे.
  • सालीचे चूर्ण बाह्य उपाय म्हणून खाजेवर व त्वचारोगांवर वापरतात.
  • कफ ढिला होण्यास, लघवीची आग कमी होण्यास व अतिसारात फळांचा काढा देतात.
  • भोकराच्या सालीची राख तेलात खलून व्रण लवकर भरून येण्यासाठी लावतात.
  • पिकलेले भोकर फळ, अडूळसा पाने व बेहडा फळे समप्रमाणात घेऊन काढा करून खोकल्यावर देतात.
  • अतिसारावर भोकरीची साल पाण्यात उगाळून देतात. मोडशीवर भोकरीची साल हरभऱ्यांच्या आंबीत उगाळून द्यावी.
  • भोकरीची पाने व्रण व डोकेदुखीवर उपयुक्त आहेत. रक्तपित्तात भोकरीच्या पानांची भाजी उपयोगी आहे.

भोकराच्या पानांची भाजी

साहित्य
भोकराची कोवळी पाने, भिजवलेली मूगडाळ, हिरव्या मिरच्या, कांदा, तेल, हळद, मीठ इत्यादी.

कृती

  • भोकराची कोवळी पाने निवडून, स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावीत.
  • पानांचे देठ काढून टाकावेत व पाने बारीक चिरून घ्यावीत.
  • तेलात चिरलेला कांदा व मिरच्या परतून तांबूस होईपर्यंत तळून-भाजून घ्यावे.
  • नंतर चिरलेली भाजी व भिजवलेली मूगडाळ घालावी.
  • हळद, मीठ घालून सर्व भाजी चांगली परतून घेऊन अगदी थोडे पाणी घालून शिजवून घ्यावी.

भोकराच्या फळांची भाजी

साहित्य
भोकरीची हिरवी कच्ची फळे, तीळ, खसखस, ओले खोबरे, आले, लसूण, तेल, तिखट, मीठ, हळद, कांदा इत्यादी.

कृती

  • भोकराची कोवळी फळे धुऊन चिरावीत.
  • बिया काढून टाकाव्यात व परत फळे चिरून घ्यावीत.
  • तीळ, खसखस थोडे भाजावेत. ओले खोबरे किसून घ्यावे.
  • तीळ, खसखस, खोबरे, लसूण, आले मिक्‍सरमध्ये बारीक करून ओला मसाला तयार करावा.
  • तेलात चिरलेला कांदा भाजून घ्यावा व त्यात चिरलेली फळे घालावीत.
  • हळद, तिखट, मीठ घालून भाजी परतून घ्यावी व नंतर ओला मसाला घालून परतावी.

सौजन्य : रानभाज्यांची माहिती पुस्तिका, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन, विकासपिडीया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *