भारंगी

शास्त्रीय नाव : Clerodendrum serratum
इंग्रजी नाव : Hill glory bower
कालावधी : जून ते ऑगस्ट
उपयुक्त भाग : पाने, फुले

औषधी गुणधर्म

  • भारंगीचे मूळ ज्वर किंवा कफ असलेल्या रोगात देतात. कफ जास्त वाढल्याने होणारा दमा, खोकला या विकारांत भारंगमूळ प्रामुख्याने वापरतात. सर्दी व घशातील शोष यावर भारंगमूळ सुंठ अथवा वेखंडाबरोबर देतात.
  • दम्यावर भारंगमूळ ज्येष्ठमध, बेहडा व अडुळसाची पाने यांचा काढा करून देतात.
  • भारंगीच्या पानांची भाजी दमा होऊ नये म्हणून आजही कोकणात वापरतात.
  • सर्दी, खोकला, ताप, छाती भरणे या विकारांत या भाजीचा उपयोग होतो.
  • पोट साफ होण्यासाठीही ही भाजी उपयुक्त ठरते. कारण ती पाचक आहे.
  • पोटात कृमी झाल्यास पाने शिजवून, त्यातील पाणी गाळून प्यावे.
  • पोट जड असणे, तोंडाची चव गुळचट असणे, तोंडात
    चिकटा जाणवणे, सकाळी उठल्यावर डोळ्यांभोवती किंचित सूज जाणवणे, अनुत्साह, हवेच्या बदलाने सर्दी होणे, कफ घट्ट होणे, अशा वेळी भारंगीच्या पानांची भाजी उपयुक्त ठरते.

भारंगीच्या पानांची भाजी

साहित्य

भारंगीची कोवळी पाने (देठ काढून टाकावेत.) अर्धी वाटी चिरलेला कांदा, ५ ते ६ लसूण पाकळ्या, मीठ, तिखट, गूळ, तेल, हिंग, मोहरी, हळद इ.

कृती

  • जास्त तेलावर कांदा-लसूण परतून घ्यावे,
  • त्यावर चिरलेली भारंगीची पाने घालावीत.
  • झाकण ठेवून वाफ काढावी. पाण्याचा थोडा हबका मारावा.
  • तिखट, मीठ, हळद, थोडा गूळ व हिंग घालून शिजवून उतरवावे.
  • भारंगीची भाजी कडू असल्याने शिजवून पाणी काढून करतात.

भारंगीच्या फुलांची भाजी

साहित्य
दोन वाट्या भारंगीची फुले, एक वाटी चिरलेला कांदा, मूगडाळ, तिखट, मीठ, गूळ, तेल, मोहरी, हळद, हिंग इ.

कृती

  • फुले चिरून घ्यावीत व 2-3 वेळा पाण्यातून पिळून घ्यावीत. यामुळे कडवटपणा निघून जातो.
  • तेलाच्या फोडणीत कांदा परतावा. त्यात मूगडाळ नुसती धुऊन घालावी.
  • चिरलेली फुले घालावीत, तिखट घालावे. मंद गॅसवर परतावी.
  • प्रथम फुलांमुळे भाजी जास्त वाढते. नंतर शिजून कमी होते.
  • पूर्ण शिजल्यानंतर मीठ घालावे. नंतर गूळ घालून परतून उतरावे.
  • गुळाऐवजी साखर वापरू शकता. बेसन पेरूनही भाजी छान लागते.
  • भाजलेले डाळीचे कूट, तीळ भाजून पूड, खसखस, किसलेले खोबरे घालूनही भाजी चवदार बनविता येते.

स्त्रोत : रानभाज्यांची माहिती पुस्तिका, कृषी विभाग महाराष्ट्र शासन व निसर्गशाळा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *