आंबट चूका

शास्त्रीय नाव : Rumex Vesicarius
कूळ : Polygonaceae पॉलीगोनेसी
मराठी नाव : चुका, आंबट चुका, रोचनी
इंग्रजी नाव : ब्लॅडर डॉक सॉरेल.
चुका ही औषधी वनस्पती असून, पाने व बिया औषधात वापरतात. ही वनस्पती खूप आंबट, विरेचक (मलातील गाठी मोडणारे), दीपक, शीतल व वेदनास्थापन गुणधर्माची आहे.

औषधी उपयोग

  • चुका ही वनस्पती हृदयाच्या आजारावर, छातीत दुखणे, बद्धकोष्ठता, प्लीहारोग, उचकी, उदरवायू, दमा, श्वासनलिका दाह, अपचन, वांती व मूळव्याध अशा विकारांवर, रोगांवर उपयुक्त आहे.
  • ही वनस्पती मांसपाचक म्हणून शीघ्र काम करणारी व लोह विरघवळणारी आहे.
  • खरूज, कोड, विंचूदंश व गांधीलमाशी यासारख्या विषारी प्राण्यांच्या चावण्यावर, दंशावर चुका वापरतात.
  • शिसारी प्रतिबंध आणि भूकवर्धक हे गुणधर्म या वनस्पतीमध्ये आहेत.
  • डोकेदुखीवर चुका व कांद्याचा रस चोळावा.
  • चुक्याची पाने शीत, सौम्य विरेचक आणि मूत्रवर्धक आहेत.
  • पानांचा रस दातदुखीवर उपयुक्त आहे. ही दाहशामक म्हणूनही वापरतात.
  • चुक्याच्या बिया शीत व पौष्टिक आहेत. बिया भाजून आमांशात देतात. चुका पचननलिकेच्या रोगात वापरतात.
  • सुजेवर चुक्याची पाने वाटून त्याचा लेप करतात.
  • भाजी थंड असल्याने हातापायांची जळजळ, मूत्रमार्गाचा दाह, आदी उष्णतेच्या विकारात भाजीचा उपयोग होतो.
  • ज्यांना आतड्यांमध्ये, जठरामध्ये गरम दाह जाणवतो व उलट्या होतात, अशा रुग्णांनी चुक्याची भाजी नियमितपणे खावी.
  • आमांश (ॲमॉबियॉसिस) या विकारात अन्न न पचताच पातळ मलाबरोबर बाहेर पडते व शरीराचे पोषण नीट होत नाही, अशा वेळी चुक्याची भाजी खाल्ल्याने अन्नपचन नीट होते व मल बांधून होतो व चांगला गुण पडतो.

आंबट चुक्याची भाजी

साहित्य
चुका वनस्पतीची कोवळी पाने व फांद्या, शेंगदाणे, हरभरा डाळ, लसूण, कांदा, आले, हिरव्या मिरच्या, तेल, जिरे, मीठ इ.

कृती

  • चुक्याची भाजी स्वच्छ धुऊन कांड्यासहित बारीक चिरावी.
  • शेंगदाणे व हरभरा डाळ एकत्र करून कुकरमध्ये बोटचेपी शिजवून घ्यावी. * आले, लसूण ठेचून घ्यावे. कढईमध्ये तेल घालून, जिऱ्याची फोडणी करून त्यात आले-लसूण व बारीक चिरलेली मिरची घालावी.
  • चिरलेला चुका, शिजवलेली डाळ व शेंगदाणे घालावेत.
  • नंतर मीठ घालून मंद आचेवर दहा मिनिटे भाजी शिजू द्यावी. मधूनमधून भाजी हलवावी.

सौजन्य : रानभाज्यांची माहिती पुस्तिका, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन व विकासपेडिया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *