साउथ एशियन क्‍लायमेट आउटलुक फोरमचा अंदाज

पुणे : मध्य महाराष्ट्र, कोकणात मॉन्सूनोत्तर हंगामात (ऑक्टोबर ते डिसेंबर) सरासरीपेक्षा जादा पाऊस पडण्याची शक्यता अधिक असल्याचा अंदाज साउथ एशियन क्‍लायमेट आउटलुक फोरमतर्फे (सॅस्कॉफ) व्यक्त करण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भातही सरासरी इतका पाऊस पडणार आहे. तर संपुर्ण दक्षिण आशियाचा विचार करता मॉन्सूनोत्तर हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल. तापमान सरासरीपेक्षा किंचित अधिक राहिल, असा अंदाजही सॅस्कॉफने वर्तविला आहे.

गेल्या वर्षीच्या मॉन्सूनोत्तर पावसाचा आढावा आणि येत्या हंगामातील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी दक्षिण आशियाई देशांच्या फोरमची १७ वी बैठक नुकतीच झाली. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर ही बैठक ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. भारतासह सर्व दक्षिण आशियाई देशांतील राष्ट्रीय व विभागीय पातळीवरील हवामानविषयक संशोधन संस्था या बैठकीत सहभागी झाल्या आहेत. या बैठकीत प्रशांत महासागर आणि भारतीय समुद्रातील हवामान स्थिती व माहिती विश्‍लेषण व विचारमंथनानंतर हा अंदाज जाहीर करण्यात आला.

देशात १ ऑक्टोबरपासून पडणारा पाऊस मॉन्सूनोत्तर हंगामाचा समजला जाते. या काळात महाराष्ट्रात परतीचा पाऊस पडतो. तसेच ईशान्य मॉन्सून वाऱ्यांपासून दक्षिण भारतातील राज्यात चांगला पाऊस पडतो. सस्कॉफने प्रसिद्ध केलेल्या नकाशानुसार कोकण आणि महाराष्ट्र सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता ५० टक्के आहे. तर उर्वरीत राज्यात सरासरी पाऊस पडण्याची शक्यता अधिक आहे. १९६१ ते २०१० या वर्षांतील सरासरीनुसार ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात महाराष्ट्रातील सरासरी पावसाचे प्रमाण ९८ मिलिमीटर आहे. यात कोकणात पावसाची सरासरी १३९.६ मिमी, मध्य महाराष्ट्रात १०३.१ मिमी, मराठवाड्यात १०० मिमी, तर विदर्भात ८१.५ मिमी आहे.

मॉन्सूनोत्तर हंगामात दक्षिण अशियातील भारताची दक्षिणेकडील राज्ये, श्रीलंका, मालदीव या भागासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. यंदाच्या हंगामात अग्नेय भारत, श्रीलंका, मालदीव भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. तर हिमालय पर्वताच्या पायथ्यालगतच्या भागातही सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता अधिक आहे. तर मध्य, दक्षिण भारताचा काही भाग, उत्तर आणि मध्य बंगालच्या उपसागरालगतच्या राज्यासह मॉनमारमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता अधिक असल्याचे नमुद करण्यात आले आहे.

मॉन्सूनोत्तर हंगामात दक्षिण आशियातील बहतांशी भागात तापमान सरासरी इतके किंवा त्यापेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. जगभरातील हवामान स्थिती, विविध मॉडेलच्या निरिक्षणांच्या सहाय्याने हे अंदाज व्यक्त करण्यात आलेले आहे. प्रशांत महासागरात सध्या सौम्य ला-निना स्थिती आहे. तर इंडियन ओशन डायपोल सर्वसामान्य स्थितीत आहे. मान्सूनोत्तर काळात ही स्थिती कायम राहणार असल्याचेही सॅस्कॉफच्या अंदाजात नमुद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *