पुणे : ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शारीरिक अंतर राखण्याबरोबरच नाका-तोंडाला मास्क बंधनकारक करण्यात आले आहे. त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या व बेजाबदारपणे विनामास्क फिरणाऱ्यांवर ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्यास सुरवात केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल ४० हजार २५५ विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करून १ कोटी १३ लाख २० हजार ८९० रूपयांचा दंड वसूल केला आहे.

सामजिक अंतराची मर्यादा पाळणे, सॅनिटायझ आणि मास्क या त्रिसुत्रीचा अवलंब केला तर कोरोना संसर्ग लवकर आटोक्‍यात येऊ शकतो. त्यासाठी प्रशासनाकडून वारंवार गावपातळीवर जनजागृती केली जात आहे. परंतू, काही नागरिक विनामास्क बाहेर फिरतात. मात्र, त्यामुळे स्वत:बरोबरच दुसऱ्याचा जीव धोक्‍यात आणत आहे. कारण, संसर्ग झाल्यानंतर त्याची लक्षणे चार ते पाच दिवसांनी दिसतात. तोपर्यंत हा संसर्ग अनेक लोकांपर्यंत पोहचण्याची भिती अधिक असते.

ग्रामीण भागात बेशिस्तपणे विनामास्क फिरणाऱ्यांमध्ये सर्वाधिक कारवाई केलेल्यांची संख्या इंदापूर तालुक्‍यात आहे. ८ हजार ६०२ विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करून दंड वसूल करण्यात आला आहे. त्यापाठोपाठ हवेली तालुक्‍यात ७ हजार ८८८ जणांवर, जुन्नर तालुक्‍यात ४ हजार ७७२, मावळ तालुक्‍यात ३ हजार ४५, पुरंदरमध्ये ३ हजार २५८, मुळशी तालुक्‍यात २ हजार ४२६ तर बारामतीमध्ये १ हजार ७२० जणांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *