जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मागणी

पुणे : ग्रामीण भागात कोरोना बाधितांची संख्या प्रचंड वाढली आहे. लक्षणे दिसताच तात्काळ औषधोपचार मिळाले तर अत्यवस्थ रूग्णांची संख्या वाढणार नाही. तसेच रूग्णवाहिकेमध्ये ऑक्‍सिजन किट बसविण्यात यावे, जेणेकरून जिल्ह्यातील मृत्युचे प्रमाण कमी होईल, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केली. त्यावर जिल्हा परिषदेकडून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समन्वयाने उपायोजना करण्यात आली असून, कशाप्रकारे ही परिस्थिती हाताळायची याबाबत अध्यक्ष निर्मला पानसरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सूचना दिल्या आहेत.

जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची बैठकीत पार पडली. ग्रामीण भागात वाढलेला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी तात्काळ पावले उचलावी. रूग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध आणि औषधोपचार सुविधा मिळावी, अशी मागणी सदस्यांनी केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे, कृषी आणि पशुसंवर्धन सभापती बाबूराव वायकर, महिला व बालकल्याण सभापती पुजा पारगे, समाजकल्याण सभापती सारिका पानसरे, गटनेते शरद बुट्टेपाटील, आशा बुचके, दत्तात्रय झुरूंगे यासह अन्य सदस्य, अधिकारी उपस्थित होते.

अहवाल पॉझीटीव्ह आल्यावर त्याला तात्काळ उपचार मिळत नाही. तर काही नागरिक लक्षणे दिसूनही चाचण्या करत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे ग्रामीण भागातील बाधित आणि मृत्युचे प्रमाण वाढले आहे. आधुनिक आरोग्य केंद्राच्या पातळीवर सौम्य लक्षणे असलेल्यांना घरीच आवश्‍यक ती औषधे उपलब्ध करून दिली तर रूग्ण घरीच बरा होवू शकतो. घरात एखादा बाधित सापडल्यानंतर त्याच्या संपर्कातील व्यक्तींचे शोध होत नाही, त्यांना वेळीच मार्गदर्शन आणि मदत मिळाल्यास पुढचा संसर्ग टाळू शकतो.

बैठकीत शरद बुट्टे-पाटील यांनी प्रशासनाला धारेवर धरले. आरोग्यमंत्री व पालकमंत्री यांच्या बैठकीमध्ये सगळे छान चालले असे म्हणण्यापेक्षा अधिकाऱ्यांनी धाडसाने माहिती व उपाय मांडले पाहिजेत. तरच त्यावर उपाययोजना करता येतील आणि संसर्ग कमी होण्यास मदत होईल, असेही बुट्टेपाटील यांनी सांगितले. यावेळी अन्य सदस्यांनी आपल्या तालुक्‍यातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत आणि आवश्‍यक त्या उपाययोजनेबाबत प्रश्‍न मांडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!