गावोगावच्या दक्षता समित्या, स्वयंसेवी संस्थांनी मोहिमेत सहभागी व्हावे

मुंबई : कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात १५ सप्टेंबर पासून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही जनजागृती मोहीम दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. या जनजागृती मोहिमेला लोकप्रतिनिधी, सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत, गावोगावच्या दक्षता समित्या, स्वयंसेवी संस्थांनी मोहिमेत सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केले आहे.

मोहिमेचा पहिला टप्पा १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबरपर्यंत आणि दुसरा टप्पा १२ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर असा असणार आहे. यामध्ये घरोघरी जाऊन आरोग्य विषयक चौकशी केली जाणार आहे. यात दोन कर्मचाऱ्यांचे / स्वयंसेवकांचे एक पथक असेल. हे पथक एका दिवसात ५० घरांना भेटी देईल. या पथकामध्ये एक शासकीय कर्मचारी, आशा वर्कर आणि दोन स्थानिक स्वयंसेवक असतील. सर्वांच्या सहभागाने ही एक राज्यव्यापी मोठी मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली.

आरोग्य विषयक जनजागृती करण्यासाठी विद्यार्थी, पालक, सामान्य व्यक्ती आणि विविध सामाजीक संस्था यांना सहभागी करून घेण्यासाठी, निबंध स्पर्धा, संदेश स्पर्धा इत्यादी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकेही दिली जाणार आहेत.

अर्थचक्राला गती देण्यासाठी प्रयत्न
अर्थचक्र पुढे चालू राहण्यासाठी उद्योगधंदे सुरू करण्यात आले आहे. तसेच, शेतक-यांना कर्जमुक्त करण्यासाठी कोविड काळात सुद्धा या योजनेची अंमलबजावणी सुरूच ठेवण्यात आली. जवळपास साडे एकोणतीस लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात आले. तसेच, साडे सहा लाख आदिवासी बालकांना आणि महिलांना मोफत दुध भुकटी देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *