पुणे : जिल्ह्यात अद्याप लम्पी स्किन (अंगावर गाठी) आजाराचा प्रादुर्भाव प्रादुर्भाव झालेला नाही. आजार होऊ नये यासाठी पशुपालकांनी जनावरांची काळजी घ्यावी. लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव आढळल्यास त्वरीत जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषी व पशूसंवर्धन समितीचे सभापती बाबुराव वायकर यांनी केले आहे.

या रोगाची बाधा गाय व म्हैस वर्गातील सर्व वयोगटाच्या जनावरांना होते. लहान वासरांमध्ये रोगाची तीव्रता अधिक दिसून येते. या रोगाचा प्रसार साधारण १० ते २० टक्के जनावरांमध्ये होतो. देशी जनावरांपेक्षा संकरीत जनावरे या विषाणूला लवकर बळी पडतात. या रोगाचा प्रसार कीटक, डास, चावणार्‍या माशा, गोचिड आदींमार्फत होतो. या आजाराच्या विषाणूचा संसर्ग निरोगी व बाधित जनावरे यांच्यातील स्पर्शाने होतो.

उष्ण व आर्द्र हवामानात या रोगाचा जास्त प्रसार होतो. आजारामुळे जनावरे मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी रोगी जनावरे अशक्त होतात. त्याचे दुध उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटते. काही वेळा गर्भपात होऊन प्रजनन क्षमता घटते. असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी विधाटे यांनी सांगितले.

लम्पी स्कीनची लक्षणे

या आजारामध्ये जनावरांना ताप येणे, डोळ्यातून तसेच नाकातून स्त्राव होणे, भूक मंदावणे आदी सुरवातीची लक्षणे दिसतात. नंतर जनावराच्या अंगावर विशेष करून डोके, मान, मायांग, कास, पोटाकडील भाग आदी ठिकाणी २ ते ५ सेंटीमीटर व्यासाच्या गाठी येतात. गाभण जनावरांमध्ये गर्भपात होऊ शकतो. जनावरांचे दूध उत्पादन घटते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *