जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांची माहिती

पुणे : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. काही गावांमध्ये दहा, पंधराहून जास्त कोरोना रुग्ण सापडत आहेत. प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे पथके तयार करण्यात आलेली आहेत. घरोघरी जाऊन तपासणी व रुग्ण शोधमोहीम सुरू करण्यात आलेली आहे. मृत्यूदर कमी करण्यावर जास्त भर देण्यात येत असून, त्यासाठी तपासण्या वाढविण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी दिली.

जिल्ह्यातील कोरोना आढाव्यासंदर्भात पानसरे यांनी मंगळवारी (ता.१५) पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाला वेळोवेळी सूचना केल्या आहेत. दररोजच्या परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. समर्पित कोविड आरोग्य केंद्र व समर्पित कोविड रुग्णालयांची रोज ऑनलाइन बैठक घेऊन मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रशिक्षण व सूचना देण्यात येत आहेत.

जिल्ह्यातील १ हजार ५१ गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. सध्या ७२४ गावांमध्ये कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. तर ३२९ गावांमधील कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. ३५४ गावांमध्ये अद्याप कोरोनाने शिरकाव केलेला नाही. १५ पेक्षा जास्त सक्रिय रुग्णसंख्या असलेली गावे १३२ आहेत, यामध्ये हवेली तालुक्यातील ३१, खेड १९, शिरूर १५ गावांचा समावेश आहे. १० पेक्षा अधिक सक्रिय रुग्णसंख्या असलेल्या ६५ ग्रामपंचायती आहेत. पाचपेक्षा अधिक सक्रिय रुग्ण असलेल्या १७३ ग्रामपंचायती आहेत.

आरोग्य सर्वेक्षण कर्मचाऱ्यांची तपासणी करा
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महाआरोग्य मोहिम हाती घेण्यात आली आहे. शिक्षक, आशा कर्मचारी, आरोग्य सेविका यांच्यामार्फत सुरू आहे. मात्र, यातील काही कर्मचारी कोरोना बाधित असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे सर्वेक्षणाला जाण्याआधी कर्मचाऱ्यांची आरोग्य चाचणी करावी, त्यानंतरच त्यांना सर्वेक्षणाला पाठवावे, असे आदेश जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!