‘डीजीपी-आयजीपी’ परिषदेतील उल्लेखनीय सेवेबद्दल गौरव

पुणे : राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्पूर्ण आणि गुप्त स्वरूपाच्या ‘डीजीपी-आयजीपी’ परिषदेत उल्लेखनीय लॉंड्री सेवा दिल्याबद्दल क्लासिक ग्रुप ऑफ ड्रायक्लिनर्सचा पुणे शहर पोलिसांच्या वतीने सन्मान करण्यात आला. सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील यांनी ‘क्लासिक’चे प्रमुख दुष्यंत निकम यांना सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्य सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या उपस्थितीत गतवर्षी डिसेंबर महिन्यात पुण्यातील ‘आयसर’मध्ये ही चार दिवसीय परिषद झाली होती. देशभरातील शंभरहून अधिक पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक या परिषदेत सहभागी झाले होते.

अतिशय महत्वाच्या व्यक्ती असलेल्या या परिषदेत लॉंड्री सेवा देणारे दुष्यंत निकम महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रासह (महाराष्ट्र शासन) विविध शैक्षणिक संस्थांत लॉंड्री व्यवसायाचे प्रशिक्षण देतात. त्यांच्यावर पुणे शहर पोलिसांनी विश्वास टाकत या परिषदेत लॉंड्री सेवा पुरविण्याची संधी त्यांना दिली होती. त्या विश्वासाला साजेशी कामगिरी करत निकम यांनी तत्पर आणि चोख सेवा देऊन सर्वांचीच मने जिंकली. ७२ वर्षीय वडील त्याच दिवशी अपघात झाल्यामुळे दवाखान्यात ऍडमिट असतानाही निकम यांनी कर्तव्यात कसूर केली नाही. निकम यांनी त्यांच्या २२ सहकाऱ्यांच्या मदतीने चारही दिवस दोन शिफ्टमध्ये न चुकता, न थकता सेवा दिली. सुरक्षेच्या कारणास्तव लागणाऱ्या सर्व मशिनरी तेथेच नेऊन त्यांनी अगदी कुशलतेने काम केले, अशा शब्दांत पोलिसांनी गौरव केला आहे.

दुष्यंत निकम म्हणाले, “देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री आणि देशभरातील अतिशय व्हीव्हीआयपी दर्जाचे लोक या परिषदेत होते. चार दिवस तिथेच थांबून सेवा करण्याची संधी ‘क्लासिक’ला मिळाली. त्यासाठी लागणाऱ्या मशिनरीपासून ते सर्व व्हीव्हीआयपींच्या कपड्यांचे व्यवस्थापन केले. कपड्याना डाग लागू नये, इस्त्री करताना चिकटू नये, बटणे तुटू नयेत, कपड्यांची अदलाबदल होऊ नये, आदी बाबींवर काटेकोरपणे लक्ष देत उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न केला. या चार दिवसांच्या काळात पोलिसांची शिस्त, काटेकोर नियोजन अतिशय जवळून अनुभवता आले. देशाच्या सर्वोच्च स्थानावर असलेल्या व्यक्तींना सेवा पुरविण्याची संधी पुणे पोलिसांमुळे मिळाली, हे माझे भाग्य समजतो.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *