बांबुचे कोंब

शास्त्रीय नाव : Bambusa Arundinacea
स्थानिक नाव : बांबु कोंब, वासते, वायदे, कासेट, काष्ठी, कळक
कुळ : Poaceae
इंग्रजी नाव : Spiny Thorny Bamboo
आढळ : ही वनस्पती गवताच्या कुळातील असून तिचे आयुष्य शंभर वर्षे आहे. ही वनस्पती प्रामुख्याने कोकण व पश्चिम घाट परिसरात तसेच खानदेश व विदर्भात आढळते.

औषधी गुणधर्म :

  • बांबुचे मूळ, पाने, बिया कोवळया खोडाचे कोंब व वंशलोचन औषधात वापरतात.
  • बांबूच्या खोडांच्या पेऱ्यात तयार होणारे वंशलोचन थंड, पौष्टिक आणि कामोत्तेजक म्हणून वापरतात.
  • बांबूच्या मूळांचा रस भाववर्धक आहे. त्याची साल पुरळ बरे होण्यासाठी उपयुक्त आहे.
  • कोवळया कोंबापासून तयार केलेले लोणचे व कढी अपचनात उपयुक्त आहे.
  • कोवळे कोंब कुटून सांधेसुजीत बांधतात.
  • कोवळी पाने दालचिनी सोबत वाटून कफातून रक्त पडत असल्यास देतात.
  • बांबूच्या बिया कामोत्तेजक व संसर्गरक्षक म्हणूनही उपयोगी आहेत.
  • बांबूचे बी स्थुलांसाठी आणि मधूमेहींच्या आहारात उपयुक्त आहे.

बांबुच्या कोंबाची भाजी

साहित्य :
बांबुचे कोवळे कोंब, तेल, बारीक चिरलेला कांदा, मिरची, लसुण, जिरे, तिखट, मीठ, हळद, टोमॅटो, कोथींबीर.

कृती :

  • कोवळे कोंब निवडुन त्याचा वरील पापुद्रा सोलून काढावा. नंतर गर गरम पाण्यात उकळून घेवून २ ते ३ पाण्याने स्वच्छ धुवून किसुन बारीक करावा.
  • गॅसवर पातेले घेउन त्यात आवश्यकतेनुसार तेल टाकून त्यात बारीक चिरलेला कांदा व्यवस्थित परतुन घ्यावा, नंतर मिरची, लसूण, जिरे, तिखट, मीठ, हळद, टोमॅटो टाकून परतुन घ्यावा.
  • त्यात किसून काढलेला बारीक गर त्यात ओतावे व छान मिश्रण एकत्र करुन घ्यावे व मंद आचेवर शिजवून घ्यावे.
  • आपल्या आवडीची रुचकर व स्वादिष्ट भाजी तयार होईल.

बांबुच्या कोंबाचे वडे

साहित्य :
बांबुचे कोवळे कोंब, तांदळाचे पीठ, तेल, बारीक चिरलेला कांदा, मिरची, लसुण, ओवा, जिरे, तिखट, मीठ, हळद, कोथींबीर, कढीपत्ता.

कृती :

  • कोवळे कोंब निवडुन त्याचा वरील पापुद्रा सोलून काढावा. नंतर गर गरम पाण्यात उकळून घेवून २ ते ३ पाण्याने स्वच्छ धुवून किसुन बारीक करावा.
  • तांदळाचे पिठ घेऊन त्यात ओवा, मिरची पेस्ट, तिखट, मीठ, हळद, कांदा, कोथिंबीर, कडीपत्ता व बांबुच्या वायद्याचा बारीक लगदा त्यात टाकून मिश्रण एकत्र करुन घ्यावे.
  • त्यानंतर त्याचे वडे तयार करावे व गरम तेलात टाकुन व्यवस्थित तळून घ्यावे.

सौजन्य : रानभाज्यांची माहिती पुस्तिका, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *