zilla parishad

दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना घरोघरी जावून देणार शिक्षण

पुणे : जिल्हा परिषदेतील शाळांमधील विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेण्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आले आहे. मात्र, जिल्ह्यातील दुर्गम भागातील अनेक विद्यार्थ्यांकडे ऑनलाईनची सुविधा नाही, त्यामुळे या वंचित विद्यार्थ्यांनाही शिक्षण मिळावे यासाठी आता ‘शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारी’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय पुणे जिल्हा परिषदेने घेतलेला आहे. अशी माहिती उपाध्यक्ष व शिक्षण समिती सभापती रणजित शिवतरे यांनी दिली.

कोरोनामुळे सहा महिन्यांपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. १५ जूनपासूनचे शैक्षणिक वर्ष सुरू झाले. परंतू ग्रामीण भागासह संपूर्ण राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, राज्य शासनाकडून अद्याप शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला नाही. एकीकडे आरोग्यचा धोका तर दुसरीकडे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भिती अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये. तसेच भविष्यात शाळा सुरू झाल्यावर अभ्याक्रम पूर्ण करताना शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची दमछाक होवू नये, यासाठी जिल्हा परिषदेकडून ऑनलाईन शिक्षण सुरू केले. त्यासाठी शिक्षकांना शाळेत येण्यास सांगण्यात आले.

परंतू, अनेक विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन नाहीत. तर दुर्गम आणि डोंगरी भागात ‘नेटवर्क’ नसल्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहे. त्यापार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने ‘शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यामध्ये शिक्षकांनी दुर्गम भागातील वंचित विद्यार्थ्यांच्या घरी जावून त्यांना शिक्षण द्यायचे. ज्या ठिकाणी पाच ते दहा विद्यार्थी आहेत, त्यांना एकत्र घेऊन गावातील मंदिर, मोकळे मैदान, ओसरी याठिकाणी सामाजिक अंतराचे नियम पाळून शिक्षण द्यावे. वेळप्रसंगी एकच विद्यार्थी असेल तर त्याच्या घरी जावून त्याला शिकवणे, गृहपाठ देणे, अभ्यास तपासणे, आदी कामे करण्याच्या सूचना शिक्षकांना देण्यात आल्या असून, याचे वेळापत्रक अंतीम टप्यात आहे. पुढील तीन ते चार दिवसात हा उपक्रम सुरू होणार असल्याचे रणजित शिवतरे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *