नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी (वय ८४) यांचे आज, अल्पशा आजाराने निधन झाले. प्रणव मुखर्जी यांना १० ऑगस्ट रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर दिल्लीतील लष्करी रुग्णालयात मेंदूची शस्त्रक्रिया झाली होती. मुखर्जी यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. आज, त्यांची प्राणज्योत मालवली.

प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. अभिजीत मुखर्जी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “डॉक्टरांकडून अथक प्रयत्न, देशभरातून प्रार्थना होत असूनही माझे वडील प्रणव मुखर्जी यांचं निधन झालं आहे.”

प्रणव मुखर्जी हे भारताचे १३ वे राष्ट्रपती होते. राष्ट्रीय राजकारणात ते १९६९ पासून सक्रिय होते. भारतीय राजकारणातील अमूल्य सेवेसाठी त्यांना २००८ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तर ८ ऑगस्ट २०१९ रोजी त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ”भारतरत्न” पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात प्रणव मुखर्जी हे राजकारणात सक्रिय झाले होते. १९७३ मध्ये ते केंद्रीय मंत्रिमंडळात होते. १९८२ ते ८४ या काळात त्यांनी देशाचं अर्थमंत्रीपद भुषवलं. १९८० ते १९८५ या कालावाधीत राज्यसभेत ते लीडर ऑफ हाऊसही होते.

इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर राजीव गांधी देशाचे पंतप्रधान झाले. त्यावेळी काही राजकीय कारणांमुळे त्यांना थोडंसं बाजूला करण्यात आलं. त्यामुळे त्यावेळी राष्ट्रीय समाजवादी काँग्रेस हा पक्षही त्यांनी स्थापन केला होता. मात्र १९८९ नंतर त्यांनी हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. पी.व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात प्रणव मुखर्जी हे परराष्ट्र मंत्री होते. २००४ मध्ये जेव्हा यूपीएचं सरकार आलं तेव्हाही ते मंत्रिमंडळात होते. २०१२ ते २०१७ या काळात ते भारताचे राष्ट्रपती होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *