सुरेश रैनाचाही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार, कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. आयसीसीच्या तिन्ही क्रिकेट स्पर्धांचं विजेतेपद मिळवून देणारा एम. एस. धोनी एकमेव कर्णधार आहे. धोनीपाठोपाठ क्रिकेटपटू सुरेश रैनानेही निवृत्तीची घोषणा केली. धोनी प्रमाणेच रैनाने देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून संन्यास घेत असल्याची घोषणा केली आहे.

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने टी-२० वर्ल्ड कप, आयसीसी वर्ल्ड कप २०११ आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. अनेक सामन्यांमध्ये धोनीनं सिक्सर मारून, भारताला विजय मिळवून दिले आहेत. २०११ मध्ये वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात त्यानं मारलेला षटकार, तमाम भारतीय क्रिकेट रसिकांच्या कायम स्मरणात राहील. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या निवृत्तीबाबत चर्चा सुरू होत्या. अखेर शनिवारी (ता. १५) महेंद्र सिंग धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

जगातला बेस्ट फिनिशर म्हणून धोनीचा उल्लेख केला जातो. त्यानं १५ वर्षांच्या कारकीर्दीत ३५० वन डे सामन्यांत भारताचं प्रतिनिधित्व केलं. त्याच्या खात्यात १० शतकं आणि ७३ अर्धशतकांसह १० हजार ७७३ धावा जमा आहेत. धोनीनं ९८ ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांमध्ये ३७.६० च्या सरासरीनं १६१७ फटकावल्या आहेत. ट्वेन्टी ट्वेन्टीत त्याचा स्ट्राईक रेट तर तब्बल १२६.१३ आहे. ही सारी कामगिरी लक्षात घेऊनच धोनीला कॅप्टन कूल आणि मॅचफिनिशर या उपाधी त्याला मानानं बहाल करण्यात आल्या होत्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी, आयपीएल खेळत राहणार असल्याची माहिती धोनीने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे चाहत्यांना दिली.

दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक ठोकणारा सुरेश रैना हा पहिला भारतीय फलंदाज आहे. २०११ मध्ये वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघाचा तो सदस्य होता. सुरेश रैनाने २२६ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रातिनिधीत्व केले आहे. रैनाने ३५.३१ च्या सरासरीने ५६१५ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये ५ शतक व ३६ अर्धशतक झळकावले आहेत. कसोटी कारकिर्दीत १९ कसोटी सामने खेळले असून, २६.१८ च्या सरासरीने ७६८ धावा केल्या आहेत. यात १ शतक व ७ अर्धशतकांचा समावेश आहे. टी-२० प्रकारात सुरेश रैनाने ७८ सामने खेळले आहेत. टी-२० च्या प्रकारात त्याने २९.२ च्या सरासरीने १६०५ धावा केल्या आहेत.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *