dahi-handi

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीतर्फे आयोजन

पुणे : गोविंदा रे गोपाळा च्या गजरात दरवर्षी मोठया जल्लोषात साजऱ्या होणाऱ्या दहीहंडी उत्सवावर यंदा कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे एकलव्य बालशिक्षण व आरोग्य न्यासमधील मुलांनी सोशल डिन्स्टसिंग पाळून मास्क घालत दहीहंडी उत्सव साजरा केला. कोणतेही मानवी थर न लावता श्रीकृष्णाच्या वेषातील विघ्नेश भोई या चिमुकल्याने दहीहंडी फोडून निरोगी आरोग्याचा संदेश दिला.

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीतर्फे सोमवार पेठेतील भोलागिरी शाळेत आरोग्याची दहीहंडी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे, युवाशाहीर होनराज मावळे, अरुणकुमार बाभुळगावकर, सुरेश तरलगट्टी, एकलव्य संस्थेचे मल्हारी कांबळे आदी उपस्थित होते. कै.प्राची प्रकाश काळे स्मरणार्थ माता यशोदा सन्मान वंचित मुलांचे बालसंगोपन करणा-या एकलव्य न्यासाच्या प्रतिभा श्रीयन यांना प्रदान करण्यात आला.

शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, दरवर्षीप्रमाणे यंदाही वंचित मुलांना उत्सवांचा आनंद घेता यावा, याकरीता या उपक्रमाचे प्रतिकात्मक पद्धतीने आयोजन करण्यात आले. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याची दहीहंडी उभारण्यात आली. यातून मुलांना निरोगी आरोग्याचा संदेश देण्यात आला. तसेच आरोग्यविषयक साधने देखील देण्यात आली. दहीहंडीनिमित्त मुलांना पुरणपोळीचे जेवण देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *