जिल्ह्यातील ४२ टक्के ग्रामपंचायतीत शिरकाव

पुणे : जिल्ह्यातील प्रमुख पाच मार्गावर असणाऱ्या गावांत कोरोना प्रसाराचा वेग सर्वाधिक आहे. यात प्रामुख्याने हवेली, खेड, आंबेगाव, शिरूर, मावळ, मुळशी तालुक्याचा समावेश आहे. जिल्ह्यातील ४२ टक्के ग्रामपंचायतीत कोरोनाचा शिरकाव झाला असून त्यातील ८६ टक्के रूग्ण हे पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील नागरिकांच्या संपर्कात आल्याने बाधित झाले आहेत.

जिल्ह्यात पुणे-नाशिक, पुणे-सातारा, पुणे-मुंबई, पुणे-सोलापुर, पुणे-नगर हे प्रमुख महामार्ग आहेत. या मार्गावर असलेले हवेली, खेड, मावळ, मुळशी, शिरूर या तालुक्यातील गावात सर्वाधिक कोरोना बाधित आहेत. या तालुक्यात औद्योगिक वसाहत असल्याने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. तसेच मोठ्या बाजारपेठा असल्याने खरेदी आणि विक्रीसाठीही व्यापारी आणि नागरिक येत असतात. परिणामी पुण्यातील नागरिकांचा संबंध ग्रामीण भागात वाढत असल्याने रूग्णांची संख्याही वाढत आहे. वाघोली, शिक्रापुर, कोरेगावभीमा, रांजणगाव, लोणीकाळभोर, उरूळी कांचन, मांजरी या सारख्या गावात मोठ्या प्रमाणात रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. येथील लोकसंख्याही अधिक कोरोना प्रसाराचा धोकाही अधिक आहे.

जिल्ह्यातील १३ तालुक्यातील जवळपास ५८८ ग्रामपंचायतीत कोरोना प्रसाराचा वेग अधिक आहे. येथील ८६ टक्के रूग्ण हे पुण्यातील आणि पिंपरी चिंचवड येथील नागरिकांच्या संपर्कात आल्याने बाधित झाले आहेत. ही गावे महामार्गालगत असल्याने या ठिकाणी रूग्ण वाढले आहेत.
– आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *