कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील ; दुसरा हप्ता कामगारांच्या खात्यात जमा होण्याची कार्यवाही सुरू

मुंबई : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणीकृत बांधकाम मजूरांना आणखी तीन हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. त्यांच्या खात्यात दुसरा हप्ता मंजूर करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.

राज्यातील १० लाख बांधकाम मजूरांना या निर्णयाचा फायदा मिळणार आहे. अर्थसहाय्य वाटपावर मंडळामार्फत ३०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, कोविड -१९ या विषाणूच्या प्रादूर्भाव कालावधीत दोन हजार रुपयाच्या अर्थसहाय्याचा पहिला हप्ता एप्रिल २०२० मध्ये मंजूर करण्यात आला होता. या निर्णयानुसार जुलै २०२० पर्यंत राज्यातील ९ लाख १४ हजार ७७८ बांधकाम मजूरांच्या बँक खात्यात अर्थसहाय्याची रक्कम जमा करण्यात आली. यासाठी मंडळाने १८३ कोटी रुपये खर्च केले आहेत.

सध्या राज्यात लॉकडाऊन कालावधीला टप्प्याटप्प्याने शिथिलता देण्यात येत आहे. इमारत व इतर बांधकामे अद्यापही पूर्ववत सुरू झालेली नाही त्यामुळे बांधकाम मजूरांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही बाब विचारात घेऊन नोंदित बांधकाम मजूरांना तीन हजार रुपयाचा अर्थसहाय्याचा दुसरा हप्ता मंजूर करण्याचा निर्णय कामगार विभागाने घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *